Junnar News : राजुरी येथे वनविभागाच्या पिंजऱ्यात ५ वर्षांचा बिबट्या जेरबंद

प्रभात वृत्तसेवा
राजुरी – जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील गोविंद हाडवळे यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात या वर्षातील पाचवा बिबट्या बुधवारी (दि. ८) पहाटेच्या सुमारास जेरबंद झाला. बिबट्यांचा वाढता वावर आणि नागरिकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण यामुळे वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. राजुरी येथील फुलगंगा मळा शिवारात गोविंद शंकर हाडवळे यांच्या शेताजवळ आणि राजुरी-जाधववाडी रस्त्याला वनविभागाने पिंजरा लावला होता.
घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी विष्णू उचाळे, ए. जी. सोनवणे तसेच रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला ताब्यात घेतले. पकडलेला बिबट्या सुरक्षितरीत्या माणिकडोह बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आला. राजुरी परिसरात उसाच्या क्षेत्रामुळे बिबट्यांचा वावर वाढला असल्याने या भागात आणखी पिंजरे वाढवून बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी यांनी केली आहे.





