Junnar Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; तक्रार करायला गेलेल्या कुटुंबावरच हल्ला

प्रभात वृत्तसेवा
जुन्नर – येथे विटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडित कुटुंबाला विटभट्टी मालक आणि त्यांच्या दोन मुलांनी शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी चार जणांविरोधात ‘पोक्सो’ कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील एक कुटुंब जुन्नरमध्ये विटभट्टीवर काम करत आहे. या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी घरासमोरील झुडपात शौचास गेली असता, एकाने तिला अडवून तिचा हात पकडला आणि ‘माझ्यासोबत चल’ असे म्हणाला. घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.पीडित मुलीचे आई, वडील, काका आणि एक मित्र या घटनेची तक्रार विटभट्टी मालकांना देण्यासाठी गेले.
मात्र, मालक मच्छिंद्र माळी, राधाकृष्ण जाधव आणि मच्छिंद्र जाधव यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एकाने महिलेशी लज्जास्पद वर्तन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आरोपींनी पोलिसांनाही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मच्छिंद्र माळी, राधाकृष्ण जाधव, मच्छिंद्र जाधव आणि सागर जाधव (सर्व रा. खोरेवस्ती, जुन्नर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे आणि अंमलदार विजय जंगम करत आहेत.





