पुणे जिल्हा | जुन्नर शहर अतिक्रमण मुक्त करणार

जुन्नर, (वार्ताहर) – शहरातील भटकी जनावरे, कुत्री तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे, हातगाडी व भाजीपाला फळ विक्रेते यांची मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे येत्या काही दिवसात काढण्यात येणार असून अतिक्रमणमुक्त जुन्नर शहर करण्यात येणार आहे, असे आश्वासन जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिले.
शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत नागरिकांचे तसेच माजी नगरसेवक शहर लोकप्रतिनिधी यांचे काय मत आहे हे जाणून घेण्याकरिता तसेच प्रशासनात समन्वय राहण्याकरिता नगरपरिषदेत कामकाज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अतुल बेनके बोलत होते
जुन्नर नगर परिषद येथील सभागृहात आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २०) प्रशासकीय कामकाजांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याधिकारी प्रशासक संदीप भोळे, माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, माजी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, माजी नगरसेवक भाऊ कुंभार, फिरोज पठाण, अंकिता गोसावी, अश्विनी गवळी, मोनाली मस्के, कविता गुंजाळ, सुवर्णा बनकर,
सना मन्सुरी, हाजरा इनामदार, अविनाश करडीले, नंदकुमार तांबोळी, मधुकर काजळे आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
जुने बस स्थानक ते पाच रस्ता चौक मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील फुटपाथवर झालेले अतिक्रमण येत्या काही दिवसात हटविण्याच्या सूचना आमदार अतुल बेनके यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. शिवाय शहरात मोठ्या प्रमाणात लावण्यात येत असलेले फ्लेक्स तातडीने हटवून याबाबत नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबतही त्यांनी यावेळी सांगितले.
जुन्नर नगरपरिषद मालकीच्या पद्मावती तलाव परिसरात झालेली अतिक्रमणे मोजणी करून काढावी लागणार आहेत तसेच नगरपरिषदेचा जलतरण तलाव अनेक वर्षांपासून बंद आहे. तो नव्याने दुरुस्त करण्याकरिता सुमारे एक कोटीचा निधी देऊन नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या सर्व सूचनांबाबत होणाऱ्या कार्यवाहीसाठी पुढील महिन्यात पुन्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीला उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या वतीने आलेल्या विविध समस्या उपस्थित करून नगरपरिषदेकडून ठोस उपयोजना होण्याबाबत सूचना केल्या.
स्वच्छ पाणी पुरविणार…
शहरातील नागरिकांना कमी दाबाने तसेच अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याने असलेल्या यंत्रणेत योग्य ती दुरुस्ती करून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
तसेच आगामी काळात साथीचे आजार रोखण्याकरिता शहरात नियमितपणे धुरळणी तसेच नालेसफाई, ठीक-ठिकाणी साठणारे सांडपाणी व कचरा याबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार बेनके यांनी यावेळी दिल्या.





