Junnar Agriculture Crisis – अतिवृष्टी, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि प्रतिकूल हवामानामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम जुन्नर तालुक्यातील बागायतदारांसाठी मोठ्या संकटाचा ठरला आहे. अपेक्षित घडनिर्मिती न झाल्याने सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले असून, यंदा द्राक्ष उत्पादकांना सुमारे 100 कोटी रुपयांचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. यावर्षी द्राक्ष निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेतील विक्री मिळून जेमतेम 35 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मागील 40 वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याने संपूर्ण हंगाम जवळपास वाया गेला असल्याची भावना बागायतदार व्यक्त करत आहेत. मे 2025 मध्ये तालुक्यात तब्बल 340 मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर दीर्घकाळ सूर्यप्रकाशाचा अभाव राहिल्याने सप्टेंबर-ऑक्टोबर छाटणीनंतर जवळपास 80 टक्के द्राक्ष बागांना घडनिर्मितीच झाली नाही. परिणामी सुमारे एक हजार एकर क्षेत्रातील प्रामुख्याने जम्बो जातीच्या बागांवर शेतकर्यांना अक्षरशः कुर्हाड चालवावी लागली. जुन्नर तालुका राज्यात निर्यातक्षम जम्बो द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. तालुक्यात जम्बो, शरद सीडलेस, फ्लेम, क्रिमसन, किंग बेरी, सुपर सोनाका आणि थॉमसन सीडलेस आदी जातींचे उत्पादन घेतले जाते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी स्व. भालचंद्र बनकर, अनिल मेहेर आणि प्रकाश पाटे यांनी तालुक्यात द्राक्ष लागवडीचा प्रयोग सुरू केला होता. त्यानंतर ही परंपरा अधिक बळकट होत गेली. जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी पुणे जिल्हा बँक, सहकारी सोसायट्या, पतसंस्था आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून सुमारे 50 कोटी रुपयांचे पीक व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले आहे. हंगाम अडचणीत आल्याने मार्चअखेर कर्जफेड कशी करायची, ही चिंता शेतकर्यांना सतावत आहे. हवामान बदलाचा फटका बसल्याने अनेक शेतकरी आरा 35 आणि आरा 36 या अमेरिकन पेटंट व्हरायटीकडे वळण्याचा विचार करत आहेत. मात्र या जातींच्या लागवडीसाठी एकरी 5 ते 6 लाख रुपयांचा प्राथमिक खर्च येत असल्याने शेतकरी अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत. नारायणगाव येथील प्रगतशील शेतकरी सुनील पाटे यांनी प्रायोगिक तत्त्वावर आरा 35 या पेटंट जातीची द्राक्ष बाग तयार केली आहे. द्राक्ष शेतीमुळे तालुक्यातील स्थानिक अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर चालते. मात्र शेतकरी अडचणीत आल्याने खते, औषधे, शेणखत, फवारणी अवजारे, ट्रॅक्टर सेवा, पॅकिंग साहित्य, प्लॅस्टिक ट्रे आणि वाहतूक व्यवसाय यांवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनाही 20 ते 25 कोटी रुपयांचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.यंदाच्या हंगामाने जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांसमोर हवामान बदलाचे गंभीर आव्हान उभे केले असून, पुढील हंगामासाठी नवी रणनीती आखण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. “दरवर्षी जुन्नर तालुक्यातून सुमारे 250 कंटेनर (3250 टन) द्राक्षांची निर्यात केली जाते. मात्र यावर्षी फेब्रुवारीअखेरपर्यंत केवळ सहा कंटेनर म्हणजे 78 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.” – बिजू जोसेफ, व्यवस्थापक डीजे एक्सपोर्ट कंपनी “दरवर्षी द्राक्ष हंगामात बांगलादेशात दररोज सुमारे 50 टन द्राक्षांची निर्यात होत होती. मागील वर्षी फेब्रुवारीअखेरपर्यंत दोन हजार टन द्राक्ष निर्यात झाली होती; मात्र यावर्षी जेमतेम 500 टनांवर निर्यात थांबली.” – रोहिदास घोलप, निर्यातदार एजंट