पुणे : महाराष्ट्रात सध्या राजकीय ‘मनोमिलनाचे’ वारे जोरदार वाहत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच, दुसरीकडे एक वेगळीच चर्चा गडद होत चालली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांचं संभाव्य एकत्रीकरण! या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेलं सूचक वक्तव्य अधिकच लक्षवेधी ठरतं आहे. “10 जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन आहे. त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल,” असं विधान करत त्यांनी एकप्रकारे एकत्रिकरणाच्या चर्चांना उधाण आणलं आहे. आज एकाच मंचावर शरद आणि अजित पवार! वर्धापन दिनाच्या आदल्याच दिवशी म्हणजे आज (9 जून रोजी) पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचाही सहभाग आहे. साखर कारखाने, सहकारी बँका आणि ऊस उत्पादकांसाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरही यावेळी चर्चा होणार आहे. दोन्ही गटांतील संबंध सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर या उपस्थितीला केवळ कार्यक्रमापुरती भेट न मानता ‘संकते दूर होण्याची सुरुवात’ म्हणून पाहिलं जातं आहे. 10 जूनला दोन्ही राष्ट्रवादींचा स्वतंत्र वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट 10 जून रोजी स्वतंत्रपणे आपले वर्धापन दिन साजरे करणार आहेत: शरद पवार यांच्या गटाचा वर्धापन दिन सकाळी 10:10 वाजता शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहणाने सुरू होणार असून, त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 10:30 ते 1:10 या वेळेत मेळाव्याचं आयोजन आहे. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अन्य प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. अजित पवार गटाचाही वर्धापन दिन पुण्यातच पार पडणार आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात हा ‘संयोग’ न मानता ‘संकेत’ म्हणून पाहिला जात आहे. एकत्र येण्याच्या शक्यता वाढताहेत? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी पवार काका आणि अजितदादांना एकत्र आणण्यासाठी नेहमीच सकारात्मक आहे. पण निर्णय हा संपूर्ण पक्षाच्या भावना लक्षात घेऊनच घेतला जाईल.” त्यांच्या या विधानाने स्पष्ट होतं की दोन्ही गटांमध्ये सुसंवादाचं एक नवं पर्व सुरू होण्याची शक्यता आहे. राजकारणापेक्षा कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या सुप्रिया सुळे यांचा एक सूचक मुद्दा म्हणजे, हा वर्धापन दिन केवळ एक औपचारिकता नसून, कार्यकर्त्यांच्या मनात असलेलं मत जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील मार्ग ठरवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. “देर आहे, अंधेर नाही?” राज्याच्या राजकारणात सध्या ‘भिन्न गेलेली मने’ पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांनी जोर धरला आहे. उद्धव-राज ठाकरे, आणि आता शरद-अजित पवार हे दोन्ही राजकीय समीकरणं मराठी मतदारांमध्ये नव्या आशा जागवत आहेत. 10 जून – हा दिवस केवळ वर्धापनदिन नाही, तर कदाचित महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतो!