GST Collection : जुलैमध्ये जीएसटी संकलनात मोठी झेप; ₹2.11 लाख कोटींचा टप्पा पार
GST Collection : जुलै 2026 मध्ये देशाचे सकल GST संकलन 15.4% वाढून ₹2.11 लाख कोटींवर पोहोचले. आयातीतून मिळालेल्या कर महसुलात 28.8% वाढ झाली.

GST Collection : जुलै 2026 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनात दमदार वाढ नोंदवली गेली असून, सकल (Gross) GST महसूल वार्षिक आधारावर 15.4 टक्क्यांनी वाढून ₹2.11 लाख कोटींवर पोहोचला आहे. रिफंड वजा केल्यानंतरचा निव्वळ (Net) GST महसूल 15.8 टक्क्यांनी वाढून ₹1.81 लाख कोटी झाला आहे.
मागील वर्षी जुलै महिन्यात सकल GST संकलन ₹1.83 लाख कोटी, तर निव्वळ संकलन ₹1.57 लाख कोटी इतके होते.
जूनच्या तुलनेतही महसुलात वाढ –
जुलै महिन्याचे आकडे जूनमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांचे प्रतिबिंब मानले जातात. जून 2026 मध्ये सकल GST संकलन ₹1.95 लाख कोटी होते. त्यात जुलैमध्ये 8.4 टक्क्यांची वाढ होऊन महसूल ₹2.11 लाख कोटींवर पोहोचला.
त्याचप्रमाणे, जूनमधील ₹1.62 लाख कोटींच्या तुलनेत निव्वळ GST संकलन 11.6 टक्क्यांनी वाढून ₹1.81 लाख कोटी झाले.
आयातीतून मिळालेल्या GST महसुलात सर्वाधिक वाढ –
यंदाच्या जुलै महिन्यात GST संकलनाला सर्वाधिक आधार आयातीतून मिळालेल्या करामुळे मिळाला. देशांतर्गत व्यवहारांच्या तुलनेत आयातीतून मिळणाऱ्या GST मध्ये अधिक वेगाने वाढ झाली.
ग्रॉस डोमेस्टिक GST: 10.1% वाढ; ₹1.45 लाख कोटी
ग्रॉस इम्पोर्ट GST: 28.8% वाढ; ₹66,511 कोटी
रिफंडनंतरच्या आकडेवारीनुसार, नेट डोमेस्टिक GST: 10.5% वाढ; ₹1.27 लाख कोटी तर नेट इम्पोर्ट GST: 30.3% वाढ; ₹54,223 कोटी राहिला. या आकडेवारीवरून आयातीत वाढ आणि त्यातून मिळणाऱ्या कर महसुलात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होते.
GST रिफंडमध्येही वाढ –
जुलै महिन्यात करदात्यांना परत करण्यात आलेल्या GST रिफंडमध्येही वाढ झाली.
एकूण GST रिफंड: 13.1% वाढ; ₹29,968 कोटी
देशांतर्गत रिफंड: 7.3% वाढ; ₹17,680 कोटी
आयात रिफंड: 22.7% वाढ; ₹12,288 कोटी
दरम्यान, एप्रिल ते जुलै 2026 या कालावधीत देशाचे सकल GST संकलन 10.1 टक्क्यांनी वाढून ₹8.43 लाख कोटी झाले आहे. तर निव्वळ GST महसूल 9.2 टक्क्यांच्या वाढीसह ₹7.21 लाख कोटींवर पोहोचला आहे.
कर व अर्थतज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत मागणीतील सातत्यपूर्ण वाढ, वाढलेली आयात आणि कर नियमांचे सुधारलेले पालन यामुळे जुलैमध्ये GST संकलनाला मोठी चालना मिळाली.





