Maratha Reservation : जुहूमधील हाणामारी प्रकरण: मराठा आंदोलकावर पहिला गुन्हा दाखल, नेमंक काय घडलं होतं?

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू आहे. आजचा उपोषणाचा पाचवा दिवस असून, जरांगे यांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, काही आंदोलकांनी त्यांच्या आवाहनाकडे साफ दुर्लक्ष केल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर आलेल्या व्हिडीओतून स्पष्ट झालं आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांच्या नेत्वृत्ताखाली आझाद मैदानवर सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने गाड्या भरून राज्याच्या विविध भागातून आलेले मराठा आंदोलक ठाम मांडून बसले आहेत. मात्र, काही आंदोलकांकडून हुल्लडबाजी केली जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी आता आंदोलकावर पहिला गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
जुहू परिसरातील एका प्रकरणात मराठा आंदोलकांवर हा गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा गुन्हा मराठा आंदोलक आणि बेस्ट प्रवाशांमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाला कारण…
रविवारी ३१ अॅागस्ट या दिवशी जुहू बस स्थानकात आंदोलक आणि प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यानंतर मराठा आंदोलकांनी हाणामारीत बसच्या काचा फोडल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञांताविरोधात पहिला गुन्हा दाखल केला आहे.
मराठा आरक्षण प्रकरणी काल १ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने आझाद मैदान वगळता सीएसएमटी स्थानक, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसर मंगळवारी दुपारपर्यंत खाली करण्याचे निर्देश मराठा आंदोलकांना दिले आहेत. त्यानुसार या ठिकाणाहून मराठा आंदोलकांची वाहने हलविण्यात येत आहेत.
आझाद मैदानात एक मोठा मंडप
आता आझाद मैदानात एक मोठा मंडप उभारला जात आहे. या मंडपात अडीच ते तीन हजार लोकांना थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सीएसएमटी परिसरातील मराठा आंदोलकांच्या सर्व गाड्या रस्त्यावरुन हटवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.





