Pune : सवाईमध्ये व्हायोलिन, बासरीवादनाची जुगलबंदी

पुणे : ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या अखेरच्या दिवशीच्या पहिल्या सत्रात गायक पं. संजीव अभ्यंकर यांचे अहिरभैरव रंगले; तर दाक्षिणात्य शैलीतील व्हायोलिन आणि बासरीवादनाला जुगलबंदीलाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला
आपण कुणीच झाकीर हुसेन यांना विसरू शकत नाही, असे कार्य त्यांनी केले आहे. मी याच स्वरमंचावर झाकीरभाईंना ४० वर्षांपूर्वी भेटलो होतो.
त्यांचे स्मरणही ऊर्जा देणारे आहे. पं. भीमसेनजींच्या मनात माझ्याविषयी हळवा कोपरा होता. मी झाकीरभाई आणि भीमसेनजी, तसेच गुरू पं. जसराज यांच्या स्मृतींना वंदन करून गायन सुरू करतो, असे मनोगत पं. संजीव अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
राग अहिरभैरवमध्ये विलंबित एकतालात ‘रसिया म्हारा’ हा ख्याल त्यांनी प्रथम सादर केला. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी समर्थ रामदासांचा ‘ध्यान लागले रामाचे..’ हा अभंग सादर केला.
चढती दुपार संस्मरणीय ठरली, ती शशांक सुब्रह्मण्यम यांच्या बासरीवादन आणि आर. कुमरेश यांच्या व्हायोलिन जुगलबंदीमुळे. कर्नाटक शैलीच्या रागातील विविध ‘कृती’ या कलाकारांनी सादर करून रसिकांना वेगळा आनंद दिला.





