झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची न्यायालयीन कोठडी वाढवली

रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणखी १४ दिवस तरी न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत. रांची येथील पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने ११ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. त्यांना रांची येथील बिरसा मुंडा सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. सोरेन यांच्यावर जमीन घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. सोरेन गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले आणि त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली. हेमंत सोरेन यांनी या प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती, ज्यावर १३ जून रोजी सुनावणी पूर्ण केल्यानंतर न्यायमूर्ती रंगन मुखोपाध्याय यांच्या न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
याच जमीन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यामागील सूत्रधार मो. सद्दाम, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेता अंतू तिर्की, रजिस्ट्रार ऑफ एश्युरन्स कर्मचारी तपस घोष, संजीत कुमार आणि इतर आरोपीही गुरुवारी न्यायालयात ऑनलाइन हजर झाले आणि त्यांची कोठडीही 14 दिवसांसाठी वाढवण्यात आली.
रांचीच्या बडगई भागात साडेआठ एकर जमीन बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने 31 जानेवारीला हेमंत सोरेन यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आत. याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे.





