निकालाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात; रवींद्र वायकर व निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल

मुंबई – मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या संशयास्पद पद्धतीने निवडणूक जिंकण्याचे प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार भरत खिमजी शहा यांनी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी याचिका दाखल करून 4 जून 2024 रोजी झालेल्या मतमोजणी आणि निकालावर स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.
भरत शहा यांनी दाखल केलेल्या उच्च न्यायालयातील याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोग, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, रविंद्र वायकर तसेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना प्रतिवादी करण्यास आलेले आहे. या याचिकेतून याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की, निवडणूक आयोगाला मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात निवडणुकीचे आणि मतमोजणीचे काम करण्यात अपयश आले आहे.
याचिकाकर्ते भरत शहा यांची याबाबत तोंडी तक्रार दाखल करून घेताना ती त्यांच्या नावे न घेता तहसीलदाराने दिली अशी दाखविण्यात आली आहे. हा प्रकार अनाकलनीय असल्याचे भरत शहा यांनी नमूद केले आहे.
तसेच पोलिसांनी त्यांची भूमिका कायद्याच्या चौकटीत पार पाडली नाही आणि मतमोजणी केंद्राबाहेर असलेल्या तात्पुरत्या कंट्रल रूममध्ये 3 तास बसून ठेवल्यावर आणि नंतर वनराई पोलीस स्टेशनला नेऊन 2 तास बसून ठेवल्यावर या प्रकरणाची दखल पोलिसांतर्फे घेण्यात आली.
परंतु हा संपूर्ण कालावधी रवींद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पांडिलकर याच्या ताब्यातच संशयास्पद मोबइल फोन होता, तो सतत मोबाइलवर कार्यरत होता आणि फोन उचलत होता, अशी परीस्थिती त्यांनी नमूद केलेली आहे.
संबंधित विभागाकडून न्यायालयाने सर्व आवश्यक कागदपत्रे आणि रेकॉर्ड मागवावे. त्यासोबतच वनराई पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हाची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, केंद्रीय निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नेस्को मतमोजणी केंद्रावरील 4 जून 2024 रोजीचे सीसीटीव्ही फुटेज याचिकाकर्त्याला देण्याचे आदेश द्यावेत, अशा मागण्या याचिकेतून करण्यात आल्या आहेत.





