Satara : आबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने मतदारसंघात जल्लोष

वाई : मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पहिल्याच यादीमध्ये वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांची वर्णी लागल्याने संपूर्ण मतदारसंघात फटाक्यांच्या आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. मकरंद पाटील यांना 2009 मध्ये 21825 मते, 2014 ला 38702 मतेने, 2019 ला 43647 मते व 2024 ला 61 हजार 392 मताधिक्क्याने विजय मिळाला आहे.
हा विजयाचा वाढता आलेख पाहून यामागे असलेला त्यांचा लोकसंपर्क कार्यकर्त्यांशी असलेले आपुलकीचे नाते, 24 तास कार्यकर्त्यांसाठी झटणारे हे व्यक्तिमत्व अल्याने त्यांना संधी मिळावी, अशी मागणी कार्यकर्ते करीत होते. वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यासाठी मकरंद पाटील यांनी 4 हजार कोटी रुपये एवढा निधी शासन दरबारातून आणला व प्रत्येक गावात पायाभूत सुविधा पोहोचवण्याचे काम केले. मतदार संघातील जनतेने मकरंद आबांवर खूप प्रेम केले. काही गावांमध्ये विरोधी गटाला एकही मत नसून शंभर टक्के मतदान मकरंद आबांच्या बाजूने झाले आहे.
कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळेच मंत्री पदाची माळ त्यांच्य गळात पडली असल्याचे बोलले जात आहे. मकरंद पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर वाई शहरातील कार्यकर्त्यांनी चौका चौकामध्ये जाऊन फटाक्यांची आतिषबाजी केली. तसेच यावेळी मकरंद पाटील यांच्या विजयाचा जयघोष केला. आमदार मकरंद पाटील यांचे मूळ गाव असलेल्या बोपेगाव (ता. वाई) येथे गावकर्यांकडून जल्लोष करण्यात आला. तसेच आमदार मकरंद पाटील यांची शपथ मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली. यावेळी गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती.
तात्यांचे स्वप्न पूर्ण
आमदार मकरंद पाटील हे पहिल्यापासूनच जनतेमध्ये समाजकारण व राजकारण करत आले आहेत. स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील व आमदार मकरंद पाटील या दोघांच्या स्वभावातही फरक होता तात्या कडक स्वभावाचे असले तरी लोकांची कामे करत होते. आबा मवाळ व स्मितभाषी असून ते जनतेमध्ये राहणे पसंत करतात. त्यामुळेच त्यांना जननायक ही पदवी जनतेने दिले आहे. आज मंत्रीपदाची शपथ घेताना स्वर्गीय लक्ष्मण तात्या पाटील यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
सुमनताई पाटील
आमदार मकरंद पाटील यांना मिळालेले मंत्रीपद हे बोपेगाव साठी अभिमान आहे. आमदार मकरंद पाटील यांनी सामाजिक व राजकीय कार्य कार्यकर्ते ही बोपेगाव गावापासून सुरू केली ते आज या राज्याचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला असून ही बोपेगावकर यांच्यासाठी अभिभानाची गोष्ट आहे.
विठ्ठल शिंदे – चेअरमन – विकास सेवा सोसायटी, बोपेगाव.





