Jual Oram : केंद्रीय मंत्री ओराम घेणार राजकीय संन्यास?

भुवनेश्वर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जुएल ओराम यांनी शनिवारी यापुढे निवडणुका न लढवण्याचा इरादा बोलून दाखवला. त्यामुळे ओडिशातील महत्वाचे आदिवासी नेते असणारे ओराम राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. भविष्यात मी खासदारकी किंवा आमदारकीची निवडणूक लढवणार नाही.
तरूण पिढीसाठी जागा सोडण्याची वेळ आली आहे. मी आतापर्यंत १० निवडणुका लढलो आहे, असे केंद्रात आदिवासी कार्य मंत्रालयाची धुरा सांभाळणारे ६४ वर्षीय ओराम पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मी भाजपचे कार्य करेन. प्रसंगी राज्यसभेचा खासदार किंवा एखाद्या राज्याचा राज्यपालही बनेल. मात्र, थेट निवडणुका लढवणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
पक्षाने निवडणूक लढवण्यास सांगितल्यावर काय करणार, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तसे झाल्यास माझ्यापुढे इतर पर्याय राहणार नाही. मला पक्षाचा आदेश पाळावा लागेल, असे उत्तर त्यांनी दिले. ओराम आतापर्यंत ६ वेळा खासदार, तर २ वेळा आमदार बनले आहेत. याआधी ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री होते.





