IPO 2025: ‘ही’ मोठी कंपनी आणणार 4 हजार कोटींचा IPO, सेबीने दिली मंजूरी

JSW Cement IPO: JSW ग्रुपची कंपनी JSW सिमेंटच्या आयपीओ प्रस्तावाला सेबीकडून मंजूरी मिळाली आहे. कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये सेबीकडे आयपीओच्या परवानगीसाठी कागदपत्रं जमा केली होती. आता या प्रस्तावाला परवानगी मिळाली असून, कंपनी आयपीओच्या माध्यमातून 4 हजार कोटी रुपये उभारणार आहे. मात्र, आयपीओ गुंतवणूकदारांसाठी कधी खुला होईल, याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.
ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP) 10 रुपयांची फेस वॅल्यू असलेल्या या आयपीओमध्ये 2 हजार कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स आणि 2 हजार कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल शेअर्सचा समावेश असेल.
कंपनी बुक-रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्ल्याने प्री-आयपीओ प्लेसमेंट किंवा इतर प्रकारे 400 कोटी रुपयांपर्यंतचे प्रेफरेंशियल शेअर्स ऑफर करण्याचा विचार करू शकते. असे झाल्यास फ्रेश इश्यू शेअर्सची संख्या कमी होईल.
कंपनी आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या 4 हजार कोटी रुपयांपैकी 800 कोटी रुपये राजस्थानमधील नागौर येथे नवीन सिमेंट यूनिट स्थापन्यासाठी खर्च करेल. 720 कोटी रुपयांचा उपयोग थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाईल. तसेच, इतर कॉर्पोरेट कामांसाठीही हा पैसा वापरला जाईल.
दरम्यान, जेएसडब्ल्यू ग्रुपबद्दल सांगायचे तर हा ग्रुप स्टील, एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स, बी2बी ई-कॉमर्स, रिएल्टी, पेंट्स, स्पोर्ट्स आणि वेंचर कॅपिटल सारख्या विविध क्षेत्रात कार्यरत आहे. जेएसडब्ल्यू सिमेंट देखील भारतातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे.





