कोयनानगरला निसर्गाच्या कुशीतून धावणार ‘जॉय मिनी ट्रेन’; शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने पर्यटनवाढीसाठी नवा प्रकल्प

कोयनानगर – माथेरान, दार्जिलिंग, शिमला आणि निलगिरीसारख्या हिल रेल्वेप्रमाणेच मिनी ट्रेन या धर्तीवर सह्याद्रीच्या हृदयात – कोयनानगरमध्ये आणखी एक स्वप्नवत प्रवास आकार घेत आहे. पर्यटनाची गाडी अनेक वर्षं थांबली होती, पण पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ती पुन्हा रुळावर आणली आहे.
त्यांच्या पुढाकारामुळे लवकरच कोयनेच्या हिरव्या दऱ्यांमधून “जॉय मिनी ट्रेन” धावणार असून, पर्यटकांना निसर्गाच्या अद्भुत मेजवानीचा अनुभव एका जादुई सफरीत मिळणार आहे. कोयनानगरमध्ये आलेल्या पर्यटकांसाठी ही मिनी ट्रेन एक खास अनुभव ठरणार आहे.
मॉडेल रूमपासून सुरू होऊन नेहरू उद्यानापर्यंतची सफर यातून करता येणार आहे, जिथे प्रवास करताना हिरव्या दऱ्या, धरणकाठच्या लहरी, डोंगरकपारीतून पडणारे ढग आणि पाखरांची किलबिलाट अनुभवता येतील. जणू प्रत्येक वळणावर निसर्ग स्वतः बोलतोय आणि प्रवाशाला एका स्वप्नवत दुनियेत घेऊन जातोय.
ही ट्रेन केवळ प्रवास नाही, तर भावनिक सफर आहे. लहान मुलांसाठी आनंदाचा, मोठ्यांसाठी निसर्गाशी संवाद साधण्याचा आणि स्थानिकांसाठी रोजगाराचे नवे दरवाजे उघडणारा हा उपक्रम ठरणार आहे. होम स्टे, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला, मार्गदर्शक सेवा अशा अनेक उपक्रमांना या प्रकल्पामुळे नवी बाजारपेठ मिळणार आहे.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी माथेरानच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले असून, लवकरच सविस्तर प्रस्ताव तयार करून आवश्यक परवानग्या, तांत्रिक बाबी व आर्थिक आराखडा यांचा अभ्यास करून हा प्रकल्प साकार होणार आहे.
या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, संचालक डॉ. बी. एन. पाटील आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.
कोयनानगरच्या निसर्गाला नव्या पर्यटन संकल्पनेची जोड मिळाल्याने हा भाग देशी तसेच जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे उभा राहणार आहे. शंभूराज देसाईंच्या पुढाकारामुळे कोयनाचे निसर्ग, संस्कृती आणि साहस आता प्रत्येक पर्यटकासाठी सहज अनुभवण्यायोग्य झाले आहे.





