एका अनपेक्षित प्रवासाची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : एका अनपेक्षित प्रवासाची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’ चित्रपटाचा नुकताच रहस्यमय आणि थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. जर्नी चित्रपटात प्रेक्षकांना एक गूढ कथा अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये?
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक लहान मुलगा अचानक बेपत्ता होतो, ज्यामुळे त्याचे पालक चिंतेत पडतात आणि त्याला शोधण्यासाठी अथक प्रयत्न करतात. मुलगा बेपत्ता झाल्यामुळे त्याला शोधण्यासाठी आई-वडील सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांचा मुलगा कुठे आहे? मुलाला नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणार आहेत.
‘या’ कलाकारांच्या आहेत महत्वपूर्ण भूमिका
चित्रपटाची कथा स्वतः सचिन दाभाडे यांनी लिहिली असून, संवाद आणि पटकथेचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. तसेच चित्रपटाचे सहनिर्माते भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड आणि अनिकेत अरविंद बुटाला आहेत. या चित्रपटात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, आणि निखिल राठोड हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.





