पुणे जिल्हा | जोपाईवाडी शाळेला शिक्षक मिळेना!

महाळुंगे इंगळे, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे येथील जोपाईवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेची पटसंख्या 84 आहे मात्र शाळेत शिक्षक नाहीत, अशी दुर्दैवी अवस्था आहे.
शिक्षण विभागाकडे अनेकदा मागणी करून देखील या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येथ नसल्याने येथील मुलांचे भविष्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
जोपाईवाडी शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. प्रामुख्याने आदिवासी वस्तीत ही शाळा असल्यामुळे येथे आदिवासी मुलांची संख्या जास्त आहे.
46 मुले आणि 38 मुली, अशी एकूण 84 पटसंख्या शाळेची असून देखील या ठिकाणी मुलांना शिकवण्यासाठी फक्त तीन शिक्षक उपलब्ध आहेत.
त्यातील एका शिक्षकाला मतदार याद्या तयार करण्याचे काम तसेच इतर प्रशासकीय कामे करावी लागतात त्यामुळे त्यांना सतत सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.
तर एक मुख्यध्यापक असून त्यांना वारंवार मिटिंग आणि अन्य कामांमुळे मुलांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही तर सर्व विद्यार्थ्यांचा भार एकाच शिक्षकावर असल्याने मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची खंत महाळुंगे इंगळे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केली.
जोेपाईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निसर्गाच्या अत्यंत चांगल्या वातावरणात असून शाळेच्या खोल्या देखील चांगले आहेत,
त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील विशेषतः आदिवासी वस्त्यांमधील मुले या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी येतात; परंतु अद्यावत, अशी शिक्षण सामग्री उपलब्ध नसल्याने आणि शिक्षक शिकवण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने किमान आणखी एक शिक्षक तरी येथे उपलब्ध करावा. अशी मागणी जोर धरीत आहे.
भोसलेंनी घेतली एका शिक्षकाची जाबाबदारी
शिक्षण विभागाकडून नवीन शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत महाळुंगे इंगळे गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोसले यांच्या सहकार्यातून शाळेला एक शिक्षक उपलब्ध करून त्या शिक्षकाचे मानधन देखील स्वतः देणार आहेत.





