भारतासह चार देशांच्या नौदलांच्या संयुक्त कवायती दोन टप्प्यांत

नवी दिल्ली – भारतासह चार देशांच्या नौदलांच्या संयुक्त कवायती पुढील महिन्यात दोन टप्प्यांत होणार आहे. मालाबार असे नामकरण करण्यात आलेल्या नौदल कवायतींमध्ये अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देशही सहभागी होणार आहेत.
संयुक्त नौदल कवायतींचा पहिला टप्पा 3 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम किनाऱ्यालगत होईल. तर, दुसऱ्या टप्प्यात 17 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत अरबी समुद्रात कवायती होतील. त्यामध्ये युद्धनौका, पाणबुड्या, सागरी विभागात गस्त घालणारी विमाने आणि हेलिकॉप्टर्स विविध प्रकारची प्रात्यक्षिके आणि आपली क्षमता दाखवतील.
भारत-चीन सीमेवर काही महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. त्यासाठी चीनी कुरापती कारणीभूत आहेत. त्यामुळे संयुक्त नौदल कवायतींमधून विविध देशांमधील वाढत्या सहकार्याचा थेट आणि स्पष्ट संदेश चीनपर्यंत पोहचणार आहे.
भारत आणि अमेरिकी नौदलांमध्ये द्विपक्षीय सहकार्याचा भाग म्हणून 1992 मध्ये मालाबार कवायती सुरू झाल्या. त्यानंतर 2015 पासून जपान त्या कवायतींचा भाग बनला. यावेळी भारताच्या निमंत्रणावरून ऑस्ट्रेलियाही त्या कवायतींमध्ये सहभागी होणार आहे.





