पुणे – विल्सन, साईबाबा यांचे संयुक्त बॅंक खाते
दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याचा सरकारी वकीलांकडून युक्तीवाद
पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणात सध्या येरवडा कारागृहात असणाऱ्या रोना विल्सन यांच्या घराच्या झडतीत त्यांचे आणि सध्या शिक्षा भोगत असलेल्या प्राध्यापक जी. एन. साईबाबा या दोघांचे सयुंक्त बॅंक खाते असल्याचे पुरावे मिळाले आहेत. दोघांच्या संयुक्त खात्याचे 24 धनादेश मिळाले असून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याचा युक्तीवाद जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी करताना जामीन फेटाळण्याची मागणी केली.
सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, मेहश राऊत आदींच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधिश किशोर वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पवार यांनी युक्तीवाद करताना सांगितले, 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाड्यावर सभा घेण्यासाठी किशोर कांबळे यांनी परवानगी घेतली होती. त्यातच कबीर कला मंचने सहभाग घेतला. कबीर कला मंच ही सीपीआय (माओवादी) संघटनेची फ्रंटल ऑर्गनाझेशन असून त्यांची धोरणे राबविण्याचे काम कबीर कला मंच करते. तसेच, अल्पसंख्याक, दलित यांना सरकार विरोधात काम करत असल्याचे ऍड. पवार यांनी न्यायालयाला सांगितले.
गौतम नवलाखा, सुद्धा भारद्वाज यांच्या अटकेविरोधात लेखिका रोमिला थापर यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज (याचिका) दाखल केला होता. त्यामध्ये राजकीयबाब सोडून अनेक गोष्टी या खटल्यात असल्याचे एका न्यायाधिशाने सुनावणी दरम्यान सांगितले होते. ही बाबही दुर्लक्षित करण्यासारखी नसल्याचेही ऍड. पवार यांनी सांगितले.





