Jogen Chowdhury : प्रख्यात चित्रकार जोगेन चौधरी यांचे निधन
प्रख्यात चित्रकार जोगेन चौधरी (Jogen Chowdhury) यांचे रविवारी सकाळी कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ते एका दुर्मिळ रक्त कर्करोगाशी दीर्घकाळ लढा देत होते.

Jogen Chowdhury : प्रख्यात चित्रकार जोगेन चौधरी (Jogen Chowdhury) यांचे रविवारी सकाळी कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ते एका दुर्मिळ रक्त कर्करोगाशी दीर्घकाळ लढा देत होते.
तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार असलेले जोगेन चौधरी (Jogen Chowdhury) गेल्या १४ महिन्यांपासून मायलोप्रोलिफेरेटिव्ह निओप्लाझम या दुर्मिळ रक्त कर्करोगाशी झुंज देत होते आणि त्यांच्यावर केमोथेरपी उपचार सुरू होते. त्यांना १६ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पूर्व कोलकात्यातील या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि सकाळी १०:१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे रुग्णालयाने सांगितले.
१६ फेब्रुवारी १९३९ रोजी अविभाजित बंगालमधील फरीदपूरच्या दाहरपारा गावात जन्मलेल्या चौधरी यांना त्यांच्या आईकडून कलेची गोडी लागली. त्यांची आई रांगोळी काढण्यात निपुण होती. फाळणीच्या काळात त्यांचे कुटुंब कोलकात्याला स्थलांतरित झाले, जिथे त्यांनी कलेचे औपचारिक शिक्षण घेतले. चौधरी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात हावडा जिल्हा शाळेत कला शिक्षक म्हणून केली. त्यानंतर १९६२ मध्ये ते कोलकात्यातील हँडलूम बोर्डमध्ये डिझायनर म्हणून रुजू झाले.
सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात, ते उच्च शिक्षणासाठी पॅरिसला गेले आणि तिथे इकोल नॅशनल सुपिरियर दे ब्यु-आर्ट्समध्ये शिक्षण घेतले. चौधरी (Jogen Chowdhury) हे तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून आले होते आणि एप्रिल २०१४ ते एप्रिल २०२० या काळात त्यांनी खासदार म्हणून काम केले.
२०१२ मध्ये, तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या बंग विभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी म्हणाले की, चौधरी (Jogen Chowdhury) यांची कलाकृती युगायुगांपर्यंत अजरामर राहील. त्यांनी मागे ठेवलेली कलासंपदा हे राज्य आणि देशासाठी एक मौल्यवान रत्न आहे.






