Joe Root Wicket : जो रुट Out होता की Not Out? आकाश दीपने टाकलेल्या ‘त्या’ बॉलवर MCC ने दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

भारत आणि इंग्लंड यांच्यात एडबस्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटच्या विकेटने क्रिकेट विश्वात मोठा वाद निर्माण केला होता. भारतीय गोलंदाज आकाश दीपने चौथ्या दिवशी रूटला क्लीन बोल्ड केले, पण त्याचा मागचा पाय ‘रिटर्न क्रीज’ला स्पर्श करत असल्याचे रिप्लेमध्ये दिसल्याने नो-बॉलचा प्रश्न उपस्थित झाला. काही चाहते आणि तज्ञांनी हा बॉल नो-बॉल असल्याचा दावा करत रूटला दिलेला आउटचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. यावर मॅरिलिबोन क्रिकेट क्लब (MCC) ने सविस्तर स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकला आहे.
MCC ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, आकाश दीपचा बॉल क्रिकेट नियमांच्या चौकटीत पूर्णपणे वैध होता. जरी आकाश दीपच्या पायाची लँडिंग ‘असामान्यपणे रुंद’ दिसली आणि त्याच्या मागच्या पायाचा काही भाग रिटर्न क्रीजच्या बाहेर जमिनीला स्पर्श करत असल्याचे दिसले, तरी तिसऱ्या अंपायरने केलेली तपासणी नियमांनुसार योग्य होती. क्रिकेटच्या नियमानुसार, बॉलरचा मागचा पाय रिटर्न क्रीजच्या आत असणे आवश्यक आहे आणि तो क्रीजला स्पर्श करू नये. MCC ने नमूद केले की, नो-बॉलच्या निर्णयासाठी पायाचा जमिनीशी ‘पहिला संपर्क’ (first point of contact) विचारात घेतला जातो. आकाश दीपच्या बॉलवेळी त्याच्या मागच्या पायाचा पहिला संपर्क क्रीजच्या मर्यादेत होता, ज्यामुळे हा बॉल वैध ठरला.
तिसऱ्या अंपायरने रिप्ले तपासून घेतलेल्या निर्णयानुसार, रूटला आउट देण्याचा निर्णय नियमांना धरून होता. MCC च्या या स्पष्टीकरणाने जो रूटच्या विकेटवरील सर्व वाद संपुष्टात आले असून, आकाश दीपचा बॉल वैध आणि रूट खरंच आउट होता, हे निश्चित झाले आहे.
आकाश दीपची सामन्यातील कामगिरी
बर्मिंगहम येथील एजबॅस्टन मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय 336 धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलसह वेगवान गोलंदाजी आकाश दीपने महत्त्वाची भूमिका निभावली. यासह आकाश दीपने नवा इतिहास रचला आहे. तो 93 वर्षात इंग्लंमध्ये 10 विकेट्स घेणारा भारताचा दुसराच गोलंदाज ठरला आहे.आकाश दीपने पहिल्या डावात 88 धावांत 4 विकेट्स घेतल्यानंतर दुसऱ्या डावात सहा इंग्लिश फलंदाजांना बाद केले.





