NZ vs ENG 1st Test : जो रूटने मोडित काढला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम, 24 वर्षांच्या मेहनतीवर फेरले पाणी…

NZ vs ENG 1st Test (Joe Root vs Sachin Tendulkar) : क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. इंग्लंडने हा कसोटी सामना T20 शैलीत जिंकला. किवी संघाने दिलेले 104 धावांचे लक्ष्य इंग्लंडने अवघ्या 12.4 षटकांत 2 गडी गमावताना पूर्ण केले. इंग्लंडने त्यांच्या बेजबॉल स्टाईलने हा सामना जिंकत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात 10 विकेट घेणाऱ्या ब्रायडन कार्सला सामनावीराचा किताब मिळाला.
क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रूट शानदार खेळी साकारत सचिन तेंडुलकरला मागे टाकत विश्वविक्रम केला आहे. रूट आता कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 15 चेंडूत 23 धावांची तुफानी खेळी खेळली. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ, त्याच्या संघाचा माजी कर्णधार अँलिस्टर कुक आणि क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
चौथ्या डावात सर्वाधिक धावा
जो रुट – 1630
सचिन तेंडुलकर – 1625
अॅलिस्टर कुक – 1611
शिवनारायण चंद्रपॉल – 1580
आतापर्यंत हा विक्रम भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत चौथ्या डावात खेळताना 60 वेळा फलंदाजी करत 1,625 धावा केल्या होत्या. आता जो रूटने चौथ्या डावात 49 वेळा फलंदाजी करताना 1,630 धावा केल्या आहेत. हा विक्रमही ऐतिहासिक आणि संस्मरणीय आहे कारण ही कामगिरी करण्यासाठी रूटने तेंडुलकरपेक्षा 11 डाव कमी खेळले. रूट आणि तेंडुलकर व्यतिरिक्त ॲलिस्टर कुक हा फलंदाज आहे ज्यांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात 1,600 हून अधिक धावा केल्या होत्या.





