जो रुटने मोडला 13 वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम

मेलबर्न : इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जो रूटने आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड पार केला. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील इंग्लंडच्या पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करत रुटने एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला.
तसेच 2008 नंतर कसोटी क्रकेटमध्ये 1600 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. रूटने या वर्षात आतापर्यंत खेळलेल्या 15 कसोटी सामन्यांत 1680 धावा केल्या आहेत. यामध्ये एक द्विविशतक, पाच शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
यापूर्वी कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याच्या नावे होता. स्मिथने 2008 मध्ये 15 कसोटी सामन्यांत 1656 धावा केल्या होत्या. यामध्ये एक द्विशतक पाच शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश होता.
कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत इंग्लंडचा कर्णधार रुट आता तिसर्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ (2006 मध्ये 1788 धावा) आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार सर व्हिव्ह रिचर्ड्स (1976 मध्ये 1710 धावा) आहेत.





