‘बाबा मी आत्महत्या करत आहे, फक्त माझा चेहरा बघा’ असे म्हणत मॉडेलने सहाव्या मजल्यावरून मारली उडी

हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून एका मॉडेलने उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना राजस्थानमधील जोधपूर येथील एका हॉटेलमध्ये घडली आहे. गुनगुन उपाध्याय असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मॉडेलचे नाव आहे. या आधी गुनगुनने तिच्या वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली. यावेळी फोनवर ‘बाबा मी आत्महत्या करत आहे, फक्त माझा चेहरा बघा’ अशी इच्छाही तिने व्यक्त केली. गुनगुनला रुग्णालयात दाखल करण्यात आले तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
उंचावरून उडी मारल्यामुळे गुनगुनच्या बरगड्या आणि पाय फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुनगुन शनिवारी उदयपूरहून जोधपूरला आली होती. ती येथील एका हॉटेलमध्ये राहिली. त्यानंतर तिने रविवारी वडिलांना फोन केला. यावेळी फोनवर तिने वडिलांना ‘बाबा मी आत्महत्या करत आहे, फक्त माझा चेहरा बघा’ अशी बोलली. यानंतर वडील गणेश उपाध्याय यांनी पोलिसांशी तात्काळ संपर्क साधला व या घटनेची पोलिसांना माहिती दिली.
एसीपी देरावर सिंह यांनी फोन नंबरच्या आधारे गुनगुनचे लोकेशन ट्रेस केले आणि ते घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत गुनगुनने सहाव्या मजल्यावरून उडी मारली होती. पोलिसांनी सांगितले की, मॉडेलला मथुरादास माथूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.



