जॉबलेस

अनेकदा असे होते की, आपण कठीण प्रसंगात सापडतो. मोठी अवघड स्थिती होऊन बसते. आता या संकटातून आपण कधी बाहेर पडू शकू का; अशी चिंता मनाला ग्रासू लागते. ही अडचणीची परिस्थिती कधी संपणारच नाही असे वाटू लागते. पण “कधी न राहील रात्र निरंतर’ हे जर आपण लक्षात ठेवले तर “प्रकाश येतो रात्रीनंतर’ याचा अनुभव आपल्याला येतोच येतो.
कसोटीच्या वेळी धीर सोडता कामा नये हे लक्षात आणून देणाऱ्या “जॉबलेस’ या शॉर्टफिल्मचे लेखन, दिग्दर्शन रोहित अगरवाल यांनी केले आहे. फिल्मच्या सुरुवातीलाच सकाळी गौरव ऑफिसला निघाला आहे. डबा देण्याची तो आईला घाई करतोय. वडील एका बाजूला पेपर वाचत बसलेत. थोडेसे उदास. आईकडून तो डबा घेतो आणि निघतो. तेवढ्यात आई त्याला घरखर्चासाठी दोन हजार रुपये मागते. तो देतो. वडिलांचा चेहरा आणखी पडलेला.
गौरव बाहेर पडल्यावर विचार करू लागतो. घरखर्चासाठी बाबा पैसे देऊ शकत नाहीत, याचे त्यांना वाईट वाटतेय. पंधरा वर्षे ते एका कंपनीत काम करत होते. पण ती कंपनी तोट्यात गेली आणि ह्यांची नोकरीही सुटली. दुसरी नोकरी मिळाली नाही म्हणा किंवा त्यांनी ती केली नाही; पण घरात पैसे येणे बंद झाले. शिलकीच्या पैशातून माझे शिक्षण घरखर्च कसातरी भागला. आता पुन्हा ते दुःखाचे दिवस दिसू नयेत एवढीच इच्छा आहे.
गौरव ऑफिसमधे जाऊन कामाला लागतो. तेवढ्यात त्याचे बॉस त्याला बोलावतात आणि सांगतात की, “तू गेली आठ वर्षे आपल्या कंपनीत खूप चांगले काम केलेस. पण आता तुझे डिपार्टमेंट बंद होणार आहे. त्यामुळे तुला आम्ही एक महिन्याची नोटिस देत आहोत. तू आता दुसरीकडे जॉब बघ.’ गौरवला धक्का बसतो. तो म्हणतो, “सर, पण तुम्हाला माहितेय, आमच्या घरात मीच एकटा कमावता आहे.’ “हो, माहीत आहे,’ बॉस म्हणतो, “पण तुला मिळेल दुसऱ्या ठिकाणी नोकरी कर.’
नोकरी गेल्याचे घरी कसे सांगायचे या चिंतेने तो खंगू लागतो. खाणेपिणे सुचत नाही. आजारल्यासारखा दिसू लागतो. गौरवची अशी सैरभैर मनःस्थिती कशामुळे झाली आहे ते त्याचे वडील ओळखतात. त्याला म्हणतात, “काही वर्षांपूर्वी माझ्या चेहऱ्यावर जे भाव होते, तेच भाव मी आता तुझ्या चेहऱ्यावर वाचतो आहे. दुर्दैवाने त्या वेळच्या माझ्या भावना कुणाला ओळखता आल्या नाहीत. पण तुझ्यावर कोणता प्रसंग आला आहे ते माझ्या लक्षात आलेय. काही चांगले करायचे असते, तेव्हा नियती आपली परीक्षा घेत असते. या परीक्षेत तू पास झाले पाहिजेस. धीर सोडू नकोस. माझ्यासारखा आऊट होऊ नकोस.’
गौरवला धीर येतो. दरम्यान त्याचा बॉस फोनवर सांगताना दिसतो की, गौरवला कुठेही नोकरी मिळता कामा नये. ऑफिसमध्ये असतानाच गौरवला एक फोन येतो. तो भेटायला जातो. तेव्हा त्याला तो मनुष्य सांगतो, “माझ्याकडे तुझ्यासाठी चांगला जॉब आहे. तुझ्या कंपनीचे डिपार्टमेंट बंद वगैरे काही ते करणार नाहीत. बॉसच्या मेव्हण्याला तुझ्या जागी बसवायचेय म्हणून त्यांनी तुला काढून टाकले.’
यातील सरळसाध्या गौरवची भूमिका गौरव भल्ला याने त्याच्या मूळ नावानेच रंगवली आहे. तो शांतपणे म्हणतो, “सगळेच आपल्या माणसांसाठी काहीतरी करतच असतात. त्यांनीही केले…’ ज्याने फोन करून गौरव भल्लाला भेटण्यासाठी बोलावलेले असते, तो त्याचा तथाकथित हितचिंतक त्याला म्हणतो, “आमच्याकडे तुझ्या कामाची कदर होईल. पगार चांगला मिळेल. फक्त एक लहानशी अट आहे.’
हा विचारतो, “कसली अट?’ “तू एवढी वर्षे तिथं काम करीत होतास. आमची कंपनी तुमच्या कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनी आहे. तू एवढंच कर की, त्या कंपनीच्या काही महत्त्वाच्या गोपनीय अंतर्गत बाबी आम्हाला सांगायच्यास.’
गौरव चिडून ताडकन उठतो आणि म्हणतो, “ज्यांनी माझे करिअर इतके दिवस सांभाळले, त्यांच्याविरुद्ध काम करायला मला सांगतोस? ते शक्य नाही. पुन्हा माझ्याशी संपर्क करू नकोस.’ पुढच्याच आठवड्यात त्याची नोकरी संपते. तो बॉसचा निरोप घ्यायला जातो, तेव्हा बॉस सांगतो की, “मी वर्षभर काही कामासाठी परदेशात जाणार आहे. या काळात इथला सगळा कारभार तू सांभाळायचा आहेस. मी तुला प्रमोशन देतो आहे.’
हा चकित. तेव्हा बॉस म्हणतो, “वर्षभर संपूर्ण कंपनी तुझ्या ताब्यात देऊन जायची… वाटले की, एकदा तुझी परीक्षा घ्यावी. तू आपल्या कंपनीचं कधीही अहित करणार नाहीस अशी मला आता खात्री पटली आहे.’
त्यानेच मुद्दाम “तो’ मनुष्य गौरवकडे पाठवलेला असतो व गौरवला परत नोकरीवर घ्यायचे असते म्हणूनच त्याला दुसरीकडे नोकरी मिळून तो हातचा जाऊ नये याबद्दलही बॉस दक्ष असतो. गौरव मनात म्हणतो, “बाबा म्हणत होते, ते बरोबरच होते. काही चांगले घडायचे होते; म्हणूनच आधी संकटे आली. आपण हरता कामा नये. धीर सोडता कामा नये.’
माधुरी तळवलकर





