पुणे जिल्हा | माझी लाडकी बहिणतून रोजगाराचे दालन

वाल्हे, (वार्ताहर) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेत केवळ 1500 रुपयांसाठी जिल्हा बँकेत ही खाती उघडली जाणार नसून या महिलांना सतत काम कसे मिळेल यासाठीही प्रयत्न करणार आहोत. तसेच या योजनांच्या माध्यमातून रोजगाराचे दालन सुरू होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुणे जिल्हा बँकेत महिलांसाठी झीरो बॅलन्स खाते उघडून देण्याच्या योजनेचा शुभारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते वाल्हे (ता.पुरंदर) येथील बँकेच्या शाखेत मंगळवारी (दि. 9) करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आजपर्यंतच्या शासकीय प्रशासकीय इतिहासात अडीच कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देणारी ही पहिलीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे.,
यावेळी, सरपंच अतुल गायकवाड, सुनिल पवार, संदेश पवार, माजी सरपंच महादेव चव्हाण, अमोल खवले, तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भुजबळ, सत्यवान सूर्यवंशी, तुषार दुर्गाडे, साम्राज्ञी लंबाते, हनुमंत पवार, मनोज भुजबळ, डॉ. रोहिदास पवार, वाल्हे शाखाप्रमुख संतोष दुर्गाडे, अनिल भुजबळ, शिरीष नवले, दिपक कुमठेकर, नितीन बुनगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
डॉ. दुर्गाडे म्हणाले, एखादी बँक चालवत असताना आर्थिक समतोल राखून निर्णय घ्यावे लागतात. मात्र, हा विचार न करता महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना आणली म्हणून विनामूल्य खाते उघडण्याचा पहिला निर्णय घेतला. फायद्या-तोट्यापेक्षा महिलांसाठी शासन मदतीचा हात द्यायला तयार असताना, त्यात कुठलीही अडचण नको म्हणून आम्ही, महायुतीतीच्या शासनाच्या मार्गदर्शनाखाली, महिलांचे झीरो बॅलन्स अकाऊंट उघडायचे ठरवले असून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा बँकचे वाल्हे शाखेचे शाखाप्रमुख संतोष दुर्गाडे, विकास अधिकारी मयूर भुजबळ, रोखपाल तरूननुम अत्तार, अनिल पवार, महेश पवार, अभिजित पवार, मकरंद चव्हाण, विकास भुजबळ आदींनी केले होते.





