पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान एका घटक पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) बिहारमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. ६ जागांवर लढणार झामुमो शेजारील राज्य झारखंडमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या झामुमोचे महासचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष बिहारमधील सहा विधानसभा मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करणार आहे. या जागांमध्ये चकाई, धमदाहा, कटोरिया (अनुसूचित जमातीसाठी राखीव), मनिहारी (अनुसूचित जमातीसाठी राखीव), जमुई आणि पीरपैंती या मतदारसंघांचा समावेश आहे. पक्षाचा स्वबळावर लढण्याचा निर्णय झामुमोचे महासचिव आणि प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, “पक्षाने बिहार निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सहा विधानसभा जागांवर निवडणूक लढवू.” आधी १२ जागांची मागणी या घोषणेच्या एक आठवडा आधी, १२ ऑक्टोबर रोजी झामुमोने १२ जागांवर आपला दावा केला होता आणि महाआघाडीच्या नेत्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा अल्टिमेटम दिला होता. भट्टाचार्य यांनी सांगितले होते की, झारखंड निवडणुकीत आम्ही राष्ट्रीय जनता दलाला (राजद) ५ टक्के जागा दिल्या होत्या, त्यामुळे झामुमोलाही बिहारच्या २४३ जागांपैकी ५ टक्के म्हणजे १२ जागा मिळायला हव्यात. दुसऱ्या टप्प्यात मतदान – बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे, तर मतमोजणी १४ नोव्हेंबरला होईल. झामुमोने ज्या सहा जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, त्या सर्व जागांवर दुसऱ्या टप्प्यात, म्हणजेच ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.