जागावाटपाबाबत फडणवीस-शिंदे निर्णय घेणार, जिंकणाऱ्या उमेदवारांनाच सेनेचे एबी फॉर्म पुणे – राज्यात मुंबई, ठाणे, पनवेलसह सर्वच महापालिकांमध्ये महायुती एकदिलाने लढणार आहे. त्यामुळे कुठेही महायुती तुटलेली नाही असे शिवसेनेचे वरिष्ठ नेते उदय सामंत यांनी मंगळवारी (दि. ३०) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पुण्यातील जागावाटपाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेणार असून, त्यांना चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा, तसेच अर्ज भरण्याची मुदत संपत असल्याने शिवसेनेकडून जिंकणाऱ्या उमेदवारांनाच एबी फॉर्म दिला असल्याचे सामंत यांनी सांगितले. उदय सामंत म्हणाले, एकाचवेळी २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे युतीच्या नेत्यांनाही चर्चेसाठी पुरेशा वेळ मिळालेला नाही. विशेषत: पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे एकमत न झाल्याने दोन्ही पक्षांनी इच्छुकांना एबी फॉर्म दिले आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीच्या आत म्हणजेच पुढील ४८ तासांत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल. त्यामुळे शिवसैनिकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनीही गैरसमज करून घेऊ नये, असेही सामंत यांनी सांगितले. महायुतीचे जागावाटप, उमेदवारीवरून शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे आणि शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा होती. पैसे घेऊन तिकिट वाटप केले जात असल्याचा आरोप होत आहे, त्यावर सामंत म्हणाले, शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी पैसे घेऊन तिकीट देणारा नाही. कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात अशी विधाने करणे दुर्दैवी, खेदजनक आहे. उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक होऊ शकतो. परंतु संबंधितांची समजूत घालण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार हे मी आधीच बोललो होतो. मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ज्या जागा पाहिजे होत्या, त्या न देता केवळ ४३ ते ४५ जागा दिल्या. मित्र पक्षाला मोठे होऊ द्यायचे नाही, आम्हीच मुंबईचे राजे आहोत, या अविर्भावात राहायचे याची प्रचिती आता राज ठाकरे यांना आली असेल. या घटनेवरूनच साडेतीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेनी पक्षात का उठाव केला, याचे उत्तर मिळाले असेल, असेही शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले.