J&K : शिवसेनेच्या ठाकरे गटाची ‘या’ दोन मागण्यासाठी जम्मूत निदर्शने
Updated On:

जम्मू :- शिवसेनेच्या ठाकरे गटाने शनिवारी जम्मू-काश्मीर निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयासमोर निदर्शने केली. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा आणि लोकनियुक्त सरकार मिळावे या मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.
जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजप युती सरकार कोसळून पाच वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही विधानसभा निवडणूक दृष्टिपथात नाही. केंद्र सरकारने राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याचे आश्वासन पाळलेले नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रदेशाध्यक्ष मनिष साहनी यांनी मांडली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 23 जूनला जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहेत. त्यावेळी काळ्या फिती बांधून आमचे कार्यकर्ते निषेध नोंदवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. निवडणूक लांबणीवर पडण्याला भाजप जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.




