जितेंद्र आव्हाडांचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर; म्हणाले “लोकसभेला बसलेल्या फटक्यामुळे…”

Jitendra Awad Vs Chhagan Bhujbal| राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. यावर जितेंद्र आव्हाडांनी छगन भुजबळ यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणात जोपर्यंत शरद पवार यांचं नाव घेत नाही तोपर्यंत आपली काही किंमत राहणार नाही, हे महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या राजकारण्यांना माहीत आहे. सगळ्या उच्चवर्णीय समाजातून विरोध असताना शरद पवारांनी पहिल्यांदा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि मंडल आयोग सुरु केला हे मान्य आहे की नाही? ज्या शरद पवारांनी आयोग सुरु केले ते शरद पवार आम्हाला का अडवतील?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. Jitendra Awad Vs Chhagan Bhujbal|
आव्हाड यांचे ट्वीट
यावेळी आव्हाड यांनी ट्वीट करत लिहिले की, “भुजबळसाहेब तुम्ही आदरणीय पवारसाहेबांबाबत केलेले वक्तव्य आम्ही सर्वांनीच ऐकले. गेली दोन वर्षे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वच बाजूंना केवळ खेळवत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठका घ्यायच्या मात्र अंतिम तोडगा काहीच काढायचा नाही, चर्चांमधे सर्वांना गुंतवून ठेवून या प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवायचे, हिच या सरकारची रणनीती आहे. परवाची आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठक हा देखील सरकारचा त्यापैकीच एक प्रकार होता.”
भुजबळसाहेब तुम्ही आदरणीय पवारसाहेबांबाबत केलेले वक्तव्य आम्ही सर्वांनीच ऐकले. गेली दोन वर्षे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वच बाजूंना केवळ खेळवत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठका घ्यायच्या मात्र अंतिम तोडगा काहीच काढायचा नाही, चर्चांमधे सर्वांना…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 14, 2024
“सरकारने आरक्षणाच्या विषयावर उचललेल्या कोणत्याही पावलांना विरोधीपक्षाने कायमच साथ दिली आहे. यापूर्वी सरकारने दोन्ही बाजूंशी चर्चा करताना विरोधी पक्षांना कधीही विश्वासात घेतले नाही. जे आम्हाला अपेक्षित होते. त्यामुळेच आम्हाला असे वाटले की, तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. पण, तुम्हाला विरोधी पक्षांची काही गरजच वाटत नाही. खरंतर परंपरेनुसार विरोधी पक्ष आणि सरकार यांनी एकत्र बसून या घडामोडींमध्ये सहभागी व्हायला हवे होते. पण, सरकारने गेल्या दोन वर्षात विरोधी पक्षाला मोजलेच नाही. किंबहुना विरोधी पक्षांची ताकदच नाही असे आपल्याला व आपल्या सरकारला वाटत होते,” असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला.
“भुजबळसाहेब आपणही बाहेर जेवढे विरोधात बोलता, तेवढेच कॅबिनेटमध्ये बोलले असते अन् कॅबिनेट ला निर्णय घ्यायला लावला असता ती आपल्यात क्षमता आहे किंवा मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर लोकांच्या प्रश्नावर लढणारा नेता म्हणून म्हणून आपलीख्याती आहे ती अजुन वृंधिंगत झाली असती. फक्त दोन समाजात तेढ निर्माण होईल, याची हे सरकार व्यवस्था करीत असते. लोकसभेला बसलेल्या फटक्यामुळे आपले सरकार अस्वस्थ आहे आणि उभ्या महाराष्ट्रला ते दिसते आहे,” असे प्रत्युत्तर आव्हाड यांनी छगन भुजबळ यांना दिले.
छगन भुजबळांचे आरोप काय?
“आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं? हे सगळं\ मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत,” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.
हेही वाचा:
निफ्टीची नवीन विक्रमी उच्चांकावर सुरुवात ; आयटी समभागांच्या स्फोटक वाढीमुळे मार्केटमध्ये उत्साह





