“बीडच्या मध्यवर्ती कारागृहात रात्री मस्त रंगते मैफिल”

बीड – संतोष देशमुख हत्याकांडाशी निगडित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडची तुरुंगात मस्त मैफल रंगत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. वाल्मीक कराडच्या दिमतीला तुरुंगात एक-दोन नव्हे तर तब्बल 7 हवालदार ठेवण्यात आल्याचा दावाही आव्हाड यांनी केला आहे.
वाल्मीक कराड सध्या बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याच्यावर आवादा पवनचक्की कंपनीकडून 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. वाल्मीक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. गत बुधवारी रात्री पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री शल्यचिकित्सा विभागाच्या तज्ज्ञांनी त्याची प्रकृतीत सुधारल्याचा अहवाल दिला. त्यानंतर त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
जितेंद्र आव्हाड सोमवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की, हॉस्पीटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे – मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते. बीड कारागृहात ते ‘आपोआप’ वाल्मिक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग, रात्री मस्त मैफिल रंगत असते.
एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो. बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत! अर्थात, तो वाल्मीक कराड आहे… वाल्मीक खडा तो वो सरकारसे बडा, थोडी तरी लाज बाळगा, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.





