मुंबईत जिओची सर्व्हिस अचानक ठप्प; मोबाईलमधून इंटरनेट झाले गायब; युजर्स त्रस्त

Jio Server Down | मुंबई शहरातील रिलायन्स जिओची सर्व्हिस अचानक बंद झाली आहे. काही युजर्सच्या मोबाइलमध्ये जिओचा सिग्नलच येत नाही. तर काहींच्या मोबाइलमधून इंटरनेट गायब झालेय. जिओची सेवा अचानक ठप्प झाल्यामुळे युजर्सचा मोठा फटका बसत आहे. Jio नेटवर्क सिम वापरणाऱ्या काही वापरकर्त्यांनी X वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर काही युजर्सनी मुकेश अंबानी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत राहणाऱ्या अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या फोनचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. सध्या सोशल मीडियावर #jiodown हा हॅशटॅग सध्या ट्रेंड करत आहे.20 टक्के लोकांनी Downdetector वर इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार नोंदवली आहे. रिलायन्स जिओची वेबसाइटही व्यवस्थित काम करत नाही.
दुपारी 12 वाजेपर्यंत डाउनडिटेक्टरवर 10 ते 15 हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. दिल्ली, लखनौ आणि मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये जिओ युजर्सला मोठा फटका बसला आहे. परंतु यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जिओ कंपनीकडूनही अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.





