Jio IPO : जिओ आयपीओला मोठ्या गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद; 8,110 कोटींच्या एंकर बुकसाठी 2.5 लाख कोटींची मागणी
Jio IPO : जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPOपूर्वी एंकर गुंतवणूकदारांकडून 8,110 कोटींच्या शेअर्ससाठी सुमारे 2.5 लाख कोटींची मागणी. IPO 21 ऑक्टोबरला खुला होणार.

Jio IPO : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या प्रस्तावित IPO ला शेअर बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने एंकर गुंतवणूकदारांसाठी 8,110 कोटी रुपयांचे शेअर्स उपलब्ध केले होते. मात्र, त्यासाठी सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची मागणी आल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे उपलब्ध शेअर्सच्या तुलनेत 30 पटींपेक्षा जास्त मागणी झाली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचा IPO सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी 21 ऑक्टोबरला खुला होणार असून, 23 ऑक्टोबरला बंद होईल.
या IPOमधून कंपनी सुमारे 30,213 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. हा IPO अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाल्यास देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO ठरू शकतो.
एंकर गुंतवणूकदारांचा उत्साह –
एंकर गुंतवणूकदार म्हणजे IPO सर्वसामान्यांसाठी खुला होण्यापूर्वी शेअर्स मिळणारे मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार असतात. जिओच्या एंकर बुकसाठी सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची मागणी आल्याने मोठ्या गुंतवणूकदारांचा कंपनीच्या व्यवसायाबाबतचा विश्वास दिसून येतो. मात्र, याचा अर्थ कंपनीला 2.5 लाख कोटी रुपये मिळणार असा नाही. उपलब्ध शेअर्सच्या मर्यादेतच एंकर गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाईल.
परदेशी गुंतवणूकदारांचीही पसंती –
जिओच्या एंकर शेअर्ससाठी ब्लॅकरॉक, कॅपिटल ग्रुप, फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स, टी. रो प्राइस, श्रोडर्स, जेपी मॉर्गन अॅसेट मॅनेजमेंट, फ्रँकलिन टेम्पलटन आणि इनवेस्को यांसारख्या मोठ्या परदेशी गुंतवणूक संस्थांनी रस दाखवल्याचे समोर आले आहे. सिंगापूरचा जीआयसी, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि नॉर्वेच्या नोर्जेस बँक इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचाही यात समावेश आहे.
भारतीय संस्थांचीही मोठी मागणी
परदेशी गुंतवणूकदारांसोबत भारतीय म्युच्युअल फंड आणि इतर संस्थांनीही जिओच्या IPOमध्ये रस दाखवला आहे. एसबीआय म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड आणि कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट यांचा त्यात समावेश आहे.
तसेच एलआयसी, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, एसबीआय पेंशन फंड्स, एचडीएफसी पेंशन आणि आयसीआयसीआय प्रुडेंशियल यांसारख्या विमा आणि पेन्शन क्षेत्रातील संस्थांनीही बोली लावल्याचे सांगितले जात आहे.
किती आहे IPOची किंमत?
जिओ प्लॅटफॉर्म्सने IPOसाठी प्रति शेअर 1,065 ते 1,119 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे. कंपनी या IPOमध्ये जास्तीत जास्त 27 कोटी नवीन शेअर्स जारी करणार आहे. वरच्या किंमत पातळीवर कंपनीला सुमारे 30,213 कोटी रुपये मिळू शकतात. यामुळे कंपनीचे मूल्यांकन सुमारे 108 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे.
IPOमधून मिळणाऱ्या पैशांपैकी काही रक्कम दूरसंचार व्यवसायाशी संबंधित सहाय्यक कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरली जाणार आहे. उर्वरित रक्कम कंपनीच्या सामान्य व्यावसायिक गरजांसाठी वापरली जाणार आहे.
जिओचा व्यवसाय किती मोठा?
मोबाइल सेवा देण्यापासून सुरू झालेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सचा व्यवसाय आता ब्रॉडबँड, डिजिटल मनोरंजन, क्लाउड आणि कंपन्यांना डिजिटल सेवा देण्यापर्यंत विस्तारला आहे. जून 2026 पर्यंत कंपनीकडे सुमारे 53.33 कोटी ग्राहक होते. कंपनीच्या माहितीनुसार, देशातील एकूण इंटरनेट डेटा वापरात जिओचा वाटा सुमारे 60 टक्के आहे.
सध्या गुंतवणूकदार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जिओच्या व्यवसायात अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करू शकतात. मात्र, जिओ प्लॅटफॉर्म्स शेअर बाजारात स्वतंत्रपणे सूचीबद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांना थेट जिओचे शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.





