Jio : जिओची ग्राहक जोडणीत आघाडी; एअरटेलपेक्षा 10 पट अधिक ग्राहक वाढ
Jio : TRAIच्या सप्टेंबर आकडेवारीनुसार जिओच्या मोबाइल ग्राहकसंख्येत १९ लाखांची वाढ झाली. एअरटेलने २ लाख ग्राहक जोडले. जिओचा कोअर ग्राहक वाढीत ८६ टक्के वाटा आहे.

Jio : रिलायन्स जिओने मोबाइल ग्राहक वाढीत एअरटेलवर मोठी आघाडी घेतली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) सप्टेंबर महिन्याच्या आकडेवारीवर आधारित डीएएम कॅपिटल आणि आयआयएफएल कॅपिटलच्या विश्लेषणानुसार, मशीन-टू-मशीन (M2M) कनेक्शन वगळल्यानंतर सप्टेंबरमध्ये जिओच्या मोबाइल ग्राहकसंख्येत १९ लाखांची वाढ झाली. त्याच वेळी एअरटेलच्या ग्राहकसंख्येत दोन लाखांची भर पडली. त्यामुळे जिओने एअरटेलच्या तुलनेत जवळपास १० पट अधिक कोअर मोबाइल ग्राहक जोडले.
देशातील कोअर मोबाइल ग्राहकसंख्येत सप्टेंबरमध्ये एकूण २२ लाखांची वाढ झाली. त्यापैकी जवळपास ८६ टक्के ग्राहक एकट्या जिओने जोडले. कोअर ग्राहकांची गणना करताना यंत्रे आणि उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या M2M कनेक्शनचा समावेश केला जात नाही.
सक्रिय ग्राहकसंख्येतही जिओची कामगिरी चांगली राहिली. सप्टेंबरमध्ये जिओच्या सक्रिय ग्राहकांमध्ये १३ लाखांची वाढ झाली. याउलट एअरटेलचे दोन लाख आणि व्होडाफोन आयडियाचे तीन लाख सक्रिय ग्राहक कमी झाले. देशातील सक्रिय मोबाइल ग्राहकसंख्येत सहा लाखांची एकूण वाढ झाली.
TRAIच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरअखेर जिओकडे ५१.११ कोटी, एअरटेलकडे ४९.४३ कोटी, व्होडाफोन आयडियाकडे २०.०१ कोटी आणि बीएसएनएलकडे ९.४३ कोटी मोबाइल ग्राहक होते. या एकूण आकडेवारीत M2M कनेक्शनचाही समावेश आहे.





