नुकताच एक मोठा निर्णय घेतला गेला आहे, ज्यामुळे भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रात एक नवी दिशा मिळणार आहे. जिओ आणि ब्लॅकरॉक या दोन मोठ्या कंपन्यांच्या भागीदारीला शेअर बाजार नियंत्रक संस्था सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या काही महिन्यांत म्हणजेच २०२५ च्या शेवटी किंवा २०२६च्या सुरुवातीला हा व्यवसाय प्रत्यक्ष सुरू होईल, अशी शक्यता आहे. ही भागीदारी भारतीय गुंतवणूकदारांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ब्लॅकरॉक ही कंपनी जगातील सर्वात मोठी गुंतवणूक व्यवस्थापन संस्था आहे. ती १० ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक हाताळते. तिचा अनुभव, ज्ञान, आणि टेक्नोलॉजी या सगळ्यांमुळे तिच्या म्युच्युअल फंड योजनांवर जगभर विश्वास ठेवला जातो. दुसरीकडे, जिओने भारतात इंटरनेट, मोबाईल आणि डिजिटल सेवा स्वस्तात उपलब्ध करून देऊन क्रांती घडवली आहे. देशाच्या दूरदराज भागांपर्यंत पोहोचण्याची क्षमता जिकडे आहे. या संयुक्त उपक्रमाचे नेतृत्व श्री. सिद स्वामिनाथन हे करणार आहेत. ते जिओ ब्लॅकरॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असतील. त्यांना आंतरराष्ट्रीय गुंतवणूक क्षेत्रात २० वर्षांहून अधिक अनुभव आहे. पूर्वी त्यांनी ब्लॅकरॉकमध्ये काम करत असताना अनेक यशस्वी गुंतवणूक धोरणे तयार केली होती. त्यांना भारतीय बाजाराची चांगली समज असून, त्यांचा उद्देश म्हणजे सामान्य गुंतवणूकदारालाही जागतिक दर्जाची सेवा देणे. ब्लॅकरॉककडे काही खास डिजिटल साधने आहेत, ज्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित आहेत. त्यातील ‘Aladdin’ नावाचे टूल हे गुंतवणुकीचा धोका ओळखणे, योग्य योजना निवडणे आणि परतावा (रिटर्न) वाढवणे यासाठी वापरले जाते. हे तंत्रज्ञान भारतात देखील वापरले जाईल. त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय अधिक शास्त्रीय, सुरक्षित आणि फायदेशीर होतील. या दोन कंपन्यांमध्ये असलेल्या ताकदी एकमेकांना पूरक आहेत. जिओकडे देशभर पोहोचण्याची क्षमता आहे तर ब्लॅकरॉककडे गुंतवणुकीचा आंतरराष्ट्रीय अनुभव. एकत्र येऊन दोघेही म्युच्युअल फंड क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतात. विशेषतः टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये म्हणजेच मध्यम आणि लहान शहरांमध्ये, जिथे अजूनही म्युच्युअल फंडसंबंधी माहिती कमी आहे, तिथे यांचा मोठा प्रभाव होईल. जिओच्या मोबाईल नेटवर्क आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करून स्थानिक भाषांमध्ये योजना समजावून सांगणे, KYC प्रक्रिया सोपी करणे, आणि ऑनलाइन गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे यावर भर दिला जाईल. या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणजे बाजारात स्पर्धा वाढेल. सध्याच्या म्युच्युअल फंड कंपन्यांनाही आपली सेवा अधिक चांगली करावी लागेल. गुंतवणूकदारांना कमी खर्चात अधिक फायदेशीर योजना मिळतील. त्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होणार आहे. आज जे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांमध्ये आधीच गुंतवणूक करत आहेत, त्यांनी आपल्या गुंतवणुकीचा आढावा घ्यावा आणि गरज असल्यास ती वाढवावी. नव्याने गुंतवणूक सुरू करायची असेल, तर हा चांगला काळ आहे कारण आता बाजारात अधिक पर्याय आणि सुविधा येणार आहेत. मात्र, म्युच्युअल फंड सल्लागारांसाठी ही एक नवी परीक्षा ठरू शकते. कारण आता ग्राहक अधिक माहितीपूर्ण आणि डिजिटल मार्गाने गुंतवणूक करू लागतील. त्यामुळे सल्लागारांनीही आपले ज्ञान वाढवणे, टेक्नोलॉजीशी जुळवून घेणे आणि ग्राहकांशी विश्वासाचे नाते टिकवणे आवश्यक होईल. सल्लागारांसाठी ही एक नवी संधीही आहे — कारण जिओ ब्लॅकरॉकसारख्या कंपनीला देशभर विश्वासार्ह सल्लागारांची गरज भासू शकते. विदेशी गुंतवणूकदार (FIIs) सुद्धा याकडे सकारात्मकतेने पाहतील. कारण ब्लॅकरॉकसारखी जागतिक कंपनी भारतात सक्रिय होणे म्हणजे भारतीय शेअर बाजारात स्थैर्य, पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन येणे. त्यामुळे FII गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यता आहे. सारांश असा की, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड व्यवसाय ही केवळ एक भागीदारी नाही, तर ती भारतीय गुंतवणूक संस्कृतीला नवी दिशा देणारी एक क्रांती आहे. ती सामान्य माणसापर्यंत जागतिक दर्जाची गुंतवणूक पोहोचवेल. तंत्रज्ञान, अनुभव, आणि नेटवर्क या तीन गोष्टींचा वापर करून, ही कंपनी भारतीय बाजारात एक नवा अध्याय सुरू करेल — असा विश्वास बळावतो आहे. -संजय साताळकर, जाहिरात व्यावसायिक आणि म्युच्युअलफंडस् गुंतवणूकदार