Xi Jinping : जिनपिंग जाणार रशियाच्या दौऱ्यावर; व्हिक्टरी डे परेडला राहणार उपस्थित

बीजिंग : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग 7 ते 10 मे दरम्यान रशियाच्या दौऱ्यावर जाणार असून मॉस्कोमध्ये व्हिक्टरी डे निमित्त होणाऱ्या लष्करी संचलनाला ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान जिनपिंग रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी संरक्षण विषयक मुद्द्यावर, तसेच महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जिनपिंग यांचा हा पहिलाच रशिया दौरा असणार आहे. यापूर्वी जिनपिंग ऑक्टोबर २०२४ मध्ये ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रशियाला गेले होते. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर सोव्हिएत संघाच्या विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या विजय दिनाच्या समारंभासाठी ब्राझील, व्हेनेझुएला आणि व्हिएतनामसह २० देशांचे नेते ९ मे रोजी मॉस्कोमध्ये येण्याची अपेक्षा आहे.
जिनपिंग यांच्या या रशिया दौऱ्यादरम्यान रशिया आणि चीन दरम्यान काही द्विपक्षीय करार देखील केले जाणार आहेत. आंतर सरकारी आणि आंतर विभागीय करारांवर दोन्ही बाजूंकडून स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींसंदर्भात पुतीन आणि जिनपिंग यांच्यात विचारविनिमय केला जाणार आहे. याशिवाय दोन्ही देशांमध्ये सर्वसमावेशक भागीदारी आणि संरक्षण संवाद देखील होणार आहे. पुतीन आणि जिनपिंग यांच्यात २०१३ पासून मैत्री संबंध आहेत. अमेरिका आणि युरोपीय संघाकडून जगाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवले जात असताना या दोन नेत्यांनी या वर्चस्वाला आव्हान दिल्याचे चित्र आहे.





