जिजामाता महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

पुणे: जिजामाता महिला सहकारी बँक लि. पुणेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवडणूक 7 ऑक्टोबर 2024 रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सुशीलानंद सभागृहात पार पडली. या निवडणुकीचे अध्यक्षस्थानी पुणे शहरातील सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक श्री. संजय राऊत होते.
या निवडणुकीत सौ. सुजाता प्रदीप जगताप यांची अध्यक्ष आणि सौ. पूजा मयुर वांजळे यांची उपाध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड झाली. बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 2.82 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, तर बँकेचे नेट एनपीए (नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स) केवळ 0.31% आहे. याशिवाय बँकेची 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा 5 सप्टेंबर 2024 रोजी पार पडली होती.
बँकेच्या ठेवी 400 कोटी, कर्ज व्यवहार 250 कोटी, भागभांडवल 14.74 कोटी, निधी 39.39 कोटी असून बँकेने 167.33 कोटींची गुंतवणूक केली आहे. तसेच, बँकेस अ वर्गाचे ऑडिट प्रमाणपत्र मिळाले आहे. बँकेने आपल्या सभासदांना 8% लाभांश आणि सेवकांना 6% सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ 17 जून 2024 रोजी अण्णाभाऊ साठे सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला होता.
महत्वाचे म्हणजे, जिजामाता महिला सहकारी बँकेला 28 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्स फेडरेशन लि.मुंबई यांच्याकडून 2023-24 या आर्थिक वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला सहकारी बँकेचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार केंद्रीय सहकार व हवाई उड्डाण राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचा स्वीकार माजी अध्यक्षा सौ. रत्नमाला म्हस्के, संचालिका सौ. सुजाता जगताप, सौ. पूजा वांजळे, सौ. मंगला भोजने, सौ. सुनीता शितोळे, सौ. सुरेखा शेलार, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य श्री. संग्राम गायकवाड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उमाकांत मुंगी यांनी केला.





