Bjp Leader Death : सत्तेतील व्यवस्थेनेच घेतला जीव? उपचाराअभावी भाजप महामंत्र्यांचा मृत्यू, राज्यात संतापाची लाट
Bjp Leader Death :

Bjp Leader Death : झारखंडमध्ये आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला असून भाजपचे महामंत्री रामेश्वर सिंह यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिमडेगा जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान रामेश्वर सिंह यांची अचानक तब्येत बिघडली आणि ते मंचावरून खाली पडले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार होऊ शकले नाहीत. उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा निषेध करत जलडेगा शहरात बंद पुकारला. शहरातील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली असून विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रामेश्वर सिंह यांची प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात आणल्यानंतरही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले आणि योग्य उपचार झाले नाहीत, असा आरोपही करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे झारखंडमधील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राज्यातील राजकारणही तापले आहे. कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून या प्रकरणात तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.



