Jharkhand Assembly elections 2024 : पहिल्या टप्प्यात महिला मतदारांनी मारली बाजी..! मतदानाचे प्रमाण पुरूषांपेक्षा ठरले अधिक, जाणून घ्या आकडेवारी…

Jharkhand Assembly Election 2024 (Phase 1) – झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करणाऱ्यांमध्ये पुरूषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक ठरले. पुरूषांपेक्षा ४.८ टक्के अधिक महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. त्यातील ४३ जागांसाठी पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला मतदान झाले. त्यावेळी पुरूष आणि महिला मिळून एकून ६६.६५ टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. मागील निवडणुकीपेक्षा (वर्ष २०१९) ते मतदान २.७५ टक्क्यांनी अधिक ठरले.
यावेळच्या पहिल्या टप्प्यात ३७ मतदारसंघांमध्ये पुरूषांपेक्षा अधिक महिलांनी मतदान केले. त्या राज्यात दुसऱ्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला ३८ जागांसाठी मतदान होईल. त्यानंतर झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबरला जाहीर होईल.
झारखंडमध्ये सध्या झामुमो, कॉंग्रेस, राजद आघाडीची सत्ता आहे. त्या आघाडीने सत्ता राखण्याच्या उद्देशातून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर, त्या आघाडीला सत्तेवरून दूर करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. आघाडी विरूद्ध भाजप आणि मित्रपक्ष असा मुकाबला अतिशय चुरशीचा होणार असल्याचे मानले जाते.





