Jejuri Temple Dress Code : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. अन्यथा तुम्हाला देवाचे दर्शन घेता येणार नाही. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळाच्यावतीने घेण्यात आला आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आले आहे. फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे. कोणते कपडे चालणार नाहीत? गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड- कमी कपडे अपेक्षित नाहीत. असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. देवाच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे, असं जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळाचे मुख्य विश्वस्त अभिजीत देवकातेंनी म्हटलं आहे. तृप्ती देसाईंचा विरोध : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी या निर्णयाला विरोध केला आहे. “जेजुरीच्या खंडोबा देवस्थानने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. मंदिरात जातांना कोणीही तोकडे कपडे घालून जात नाही. असं असताना हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आल्यापासून असे निर्णय भक्तांवर लादले जात आहेत. वस्त्रसंहितेच्या नावाखाली घेण्यात आलेला हा निर्णय जेजुरी देवस्थानकडून मागे घेण्यात यावा, अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे.