Jejuri Police – जेजुरी नगरीतील नंदी चौकात भंडार खोबरे विक्रेत्याला मारहाण करून दुकानाची तोडफोड करणाऱ्या पाच आरोपींना जेजुरी पोलिसांनी अटक केली. स्वप्नील जयेंद्र कांबळे (वय ३३, रा. दिघी पुणे), प्रणय राजू पाटोळे (वय २६), यश राजू पाटोळे (वय १९, दोघे. रा. काळेवाडी पुणे), सुधीर बाळू पाटोळे (वय ३४) व सूरज बाळू पाटोळे (वय २५ दोघे रा मरकळ, पुणे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जेजुरी येथील गडाच्या पायथ्याशी नंदी चौकात महादेव वाघमारे यांचे भंडार खोबरे व पेढे विक्रीचे दुकान आहे. (दि.३१) जानेवारी रोजी काही भाविक या दुकानासमोर येवून त्यांनी तिथे आपल्या पायातील चपला ठेवण्याचा आग्रह धरला. यावेळी दुकानदार वाघमारे यांनी आमच्या दुकानासमोर चपला ठेवून नका, ज्या ठिकाणी तुम्ही भंडार खोबरे घेतले आहे, त्या ठिकाणी चपला ठेवा, असे सांगितले. या कारणावरून दुकानदार व भाविक यांच्यात वाद होवून आरोपींनी जमाव जमवून वाघमारे यांना दांडक्याने हातापायाने मारहाण करून दुकानातील भंडार खोबरे, पेढे फेकून देवून दुकानाची मोडतोड करून आरोपी पळून गेले होते. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडिया तसेच टिव्ही चॅनलवर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. (दि.१) फेब्रुवारी रोजी फिर्यादी वाघमारे यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या व्हिडिओचा आधार घेत दोन आरोपींचे फोटो वॉट्सप ग्रुप वर प्रसारित केले. खबऱ्याकडून माहिती घेत जेजुरी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार नंदकुमार पिंगळे हे तपास करीत आहेत.