Jejuri Election : नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत? राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्याने चुरस वाढली

प्रभात वृत्तसेवा
जेजुरी – नगरपरिषद निवडणुकीसाठी रविवारी (दि.१६) अखेरपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून राष्ट्रवादी (अजित पवार) कडून ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई यांचे पुत्र जयदीप दिलीप बारभाई, शिवसेना (शिंदे) चे शहराध्यक्ष दिनेश (विठ्ठल) दिलीप सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते हरिदास बाळकृष्ण रत्नपारखी आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. १० प्रभागांतील २० जागांसाठी सुमारे ४३ अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत.
सोमवारी (दि. १७)उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने विविध पक्षातील इच्छुक उमेदवार आपले अर्ज दाखल करतील यावेळी मोठा ताण प्रशासकीय व्यवस्थेवर पडण्याची शक्यता आहे. नगरसेवक पदासाठी प्रामुख्याने माजी नगरसेवक अस्लम पानसरे, गणेश शिंदे, राष्ट्रवादी, माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख यांच्या पत्नी प्रियंका देशमुख-भाजपा, सत्यवान दादा उबाळे यांच्या पत्नी मेघा उबाळे, राष्ट्रवादी, उद्योजक कै. मेहबूब पानसरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका अमिना पानसरे – राष्ट्रवादी,
माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार यांचे पुत्र अमित कुंभार-राष्ट्रवादी, माजी नगरसेवक -दादासो खोमणे यांचे पुत्र तानाजी खोमणे-अपक्ष, माजी नगरसेविका सीमा संतोष खोमणे-राष्ट्रवादी आदींसह विविध पक्षातील उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस राहिल्याने नगरपरिषद कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.





