JD Vance : अमेरिकेचे उपाध्यक्ष वान्स येणार भारत दौऱ्यावर

वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स आणि त्यांच्या पत्नी उषा वान्स हे दाम्पत्य पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. वान्स यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली. वान्स दाम्पत्य १८ ते २४ एप्रिल दरम्यान इटली आणि भारताचा दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान जे.डी वान्स हे या दोन्ही देशांच्या नेत्यांशी आर्थिक आणि भूराजकीय प्राधान्याच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत, असे उपाध्यक्षांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात होणाऱ्या भारताच्या दौऱ्यादरम्यान वान्स पती-पत्नी नवी दिल्लीसह जयपूर आणि आग्रा येथेही जाणार आहेत. वान्स हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ते काही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे. इटलीच्या दौऱ्यात वान्स इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पररराष्ट्र मंत्री कार्डिनल पीएट्रो पारोलिन यांची भेट घेणार आहेत.
वान्स यांच्या पत्नी उषा या मूळच्या भारतीय वंशिय आहेत. जे.डी वान्स अमेरिकेचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्या पहिल्यांदाच भारतात म्हणजे माहेरी येत आहेत. उषा वान्स यांचे पालक क्रिश चिलुकुरी आणि लक्ष्मी चिलुकुरी हे १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते.





