JCB Accident : अन् अचानक मशीन सुरू झाली! जेसीबीच्या धडकेने दरीत कोसळून व्यावसायिकाचा मृत्यू
JCB Accident : पुरंदर तालुक्यातील पानवडी घाटात तांत्रिक बिघाड दुरुस्त करताना मोठी दुर्घटना; काळदरी येथील जेसीबी व्यावसायिक संदीप थोपटे यांचा दुर्दैवी मृत्यू.

JCB Accident – पुरंदर तालुक्यातील पानवडी घाटात जेसीबी मशीनला आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे घडलेल्या भीषण अपघातात काळदरी येथील जेसीबी व्यावसायिक संदीप दशरथ थोपटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी जेसीबी चालक सखाराम बंडू ढाले याच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १८) सायंकाळी चारच्या सुमारास जेसीबी वाहन (क्र. एमएच १२ आरवाय ७९२१) काळदरीहून सासवडकडे येत होती. पानवडी घाटात वाहनातील डीझेल संपल्याने तसेच तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने जेसीबी रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. त्यानंतर डीझेल भरून मशीनमधील एअर काढण्याचे काम सुरू होते. यावेळी संदीप थोपटे हे जेसीबीच्या पुढील बाजूस उभे राहून काम पाहत होते.
दरम्यान, चालक सखाराम ढाले याने समोर व्यक्ती उभी असल्याची खात्री न करता निष्काळजीपणे जेसीबी सुरू करण्याचा प्रयत्न केला. अचानक मशीन सुरू झाल्याने जेसीबीची जोरदार धडक संदीप थोपटे यांना बसली. धडकेमुळे ते ३० ते ४० फूट खोल दरीत फेकले गेले. त्याचवेळी नियंत्रण सुटलेली जेसीबीही दरीच्या दिशेने घसरू लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने जेसीबीमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला, मात्र जेसीबी दरीत कोसळली.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या संदीप थोपटे यांना तातडीने सासवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी हडपसर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र उपचार सुरू असताना गुरुवारी (दि. २१ मे) रोजी दुपारी ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेप्रकरणी मृताचे भाऊ दीपक दशरथ थोपटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासवड पोलिसांनी जेसीबी चालक सखाराम ढाले याच्याविरुद्ध निष्काळजीपणा व हयगयीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




