Stone Pelting in Saswad – मौजे सासवड येथील जेजुरी नाका चौकात शनिवारी, दि. १८ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे हिंसक रूपांतर झाल्याची घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव असलेला फलक लावण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला असून या प्रकरणी दोन्ही गटातील अनेक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साठेनगर व अशोकनगर यांच्यातील वाद वाढत जाऊन दोन्ही बाजूंनी बेकायदेशीर जमाव जमवण्यात आला. त्यानंतर परिस्थिती चिघळत जाऊन एकमेकांवर तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमाव पांगविण्याचे आवाहन केले; मात्र जमावाने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत दगडफेक सुरूच ठेवली. यावेळी पोलिसांवरही जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच परस्परांमध्ये झोंबाझोंबी होऊन सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आला व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. या प्रकरणी पोलीस हवालदार विनायक अशोक हाके (बक्कल क्र. 1974), नेमणूक सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमित साबळे, तन्मय वाघमारे, रितेश साबळे, प्रसाद सकट, बाळा उर्फ संघर्ष साबळे, बंटी उर्फ सुहास रणपिसे, दिनेश साबळे, अतिश पांडुरंग दळवी, प्रिन्स साबळे व त्यांच्या 40 ते 50 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी न्यूज. तसेच दुसऱ्या गटातील अजिंक्य प्रकाश भोंडे, कार्तिक काळूराम भोंडे, ओम मनोज भोंडे, सिद्धार्थ माणिक भोंडे, निखील दादू भोंडे, संतोष शंकर भोंडे, शुभम संतोष भोंडे, तेजस भोंडे, यश किसन जाधव, सोपान शंकर भोंडे व त्यांच्या 30 ते 35 सहकाऱ्यांवरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, अशोक नगर येथील समाजातील लोकांना पंकज शशिकांत धिवार यांनी भडकावून पोलिस व मातंग समाजातील लोकांवर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे हे करीत आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.