Jayshree Nage Case : जयश्री नागे प्रकरणात मोठा ट्विस्ट; नेमकं काय घडलं?
अकोल्यातील बहुचर्चित आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या जयश्री नागे (Jayshree Nage Case) आत्महत्या प्रकरणात अकोला जिल्हा न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे.

Jayshree Nage Case : अकोल्यातील बहुचर्चित आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या जयश्री नागे (Jayshree Nage Case) आत्महत्या प्रकरणात अकोला जिल्हा न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. पंचायत समिती निवडणुकीच्या खर्चासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणण्याचा सतत तगादा लावून जयश्री यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला होता.
या असह्य त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी (Jayshree Nage Case) आपल्या माहेरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने मृत विवाहितेचा पती आशिष वसंतराव नागे याला दोषी ठरवत ७ वर्षांच्या सक्तमजुरीची मोठी शिक्षा सुनावली आहे, तर पुराव्याअभावी सासरच्या इतर ४ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
हा संपूर्ण गुन्हा आणि त्यावेळची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. अकोल्यातील पैलपाडा येथील सासरच्या मंडळींकडून जयश्री यांचा विविध कारणांनी छळ केला जात होता. अंदाजे १० मे २०२२ रोजी जयश्री यांनी एका गोड मुलीला जन्म दिला.
मात्र, मुलगी झाल्याच्या आनंद साजरा करण्याऐवजी सासरच्या नागे कुटुंबाकडून त्यांचा छळ अधिकच वाढला. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जाऊ लागला. तसेच पती आशिष नागे हा त्यांना सतत मारहाण करत असल्याचेही समोर आले होते. त्यातच पंचायत समिती निवडणुकीसाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये, यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव टाकला जात होता.
या छळाची भीषणता आणि सासरच्या लोकांचे खरे रूप जयश्री (Jayshree Nage Case) यांनी एका पेन ड्राईव्हमध्ये साठवून ठेवले होते. त्यांनी सासरच्या त्रासाचा संपूर्ण डेटा आणि व्हिडिओ या पेन ड्राईव्हमध्ये गोळा केला होता. “माझ्या आत्महत्येला सासरचे लोक आणि पती आशिष नागे हेच जबाबदार आहेत,” असे जयश्री यांनी एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे नमूद केले होते. पोलिसांनी हा पेन ड्राईव्ह जप्त केला आणि हाच डिजिटल पुरावा न्यायालयात आरोपीला शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरला.
अकोला जिल्हा न्यायालयाने सत्र खटला क्रमांक २१९/२०२२ मधील भादंवि कलम ४९८ (अ), ३०४ (ब), ३०६, ५०४ आणि ३४ अन्वये दाखल गुन्ह्यात हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने पती आशिष वसंतराव नागे याला जयश्री यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी धरले. त्याला कलम ३०६ अंतर्गत ७ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंड, तसेच भादंवि कलम ४९८ (अ) अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणामुळे अकोला जिल्ह्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली होती, कारण या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सासरच्या लोकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मोठे नेते आणि अकोला पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव नागे (जयश्री यांचे सासरे) तसेच वंचितच्या माजी पंचायत समिती सदस्या शोभा नागे (जयश्री यांच्या सासू) यांचा समावेश होता. मात्र, न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे न मिळाल्याने या नेत्यांसह सासरच्या इतर ४ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.






