Jaykumar Gore action : रोहित पवारांच्या मतदारसंघात जयकुमार गोरेंचा मोठा दणका; थेट ग्रामपंचायतचं केली बरखास्त, काय आहे प्रकरण?

Jaykumar Gore action : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील घुमरी (ता. कर्जत) ग्रामपंचायतीवर भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कठोर कारवाई केली आहे. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठीच्या निधीचा वापर न केल्याचा ठपका ठेवत घुमरी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा आदेश गोरेंनी काढला आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप सरपंच आणि विरोधकांनी केला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1954 नुसार, मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला निधी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, घुमरी ग्रामपंचायतीने हा निधी वापरला नसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर केला.
या तक्रारीच्या चौकशीसाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते. चौकशीत निधीचा गैरवापर झाल्याचे निष्पन्न झाल्याने ॲड. अनभुले यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडे ग्रामपंचायत बरखास्तीची मागणी केली. ॲड. एल. के. गोरे यांनी युक्तिवाद करत ही मागणी पुढे रेटली.
घुमरी ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता अनभुले आणि सदस्यांनी आपला बचाव करताना सांगितले की, पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ग्रामपंचायतीला भेट दिली नाही. तसेच, निधी खर्चाबाबत कोणतेही मार्गदर्शन मिळाले नाही.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बरखास्तीचा प्रस्ताव सादर केलेला नाही, असा दावाही त्यांनी केला. त्यांनी या कारवाईला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला. “विरोधकांचा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने खोट्या तक्रारी करून ग्रामपंचायतीला लक्ष्य केले जात आहे,” असे सरपंचांचे म्हणणे होते.
मंत्री जयकुमार गोरेंनी सरपंच आणि सदस्यांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. त्यांनी नैसर्गिक न्याय तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा दावा खोडून काढत सांगितले की, ग्रामपंचायतीला आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी निधीचा वापर न करणे हे गंभीर स्वरूपाचे कर्तव्यातील कसूर असल्याचे नमूद करत गोरेंनी घुमरी ग्रामपंचायत बरखास्तीचा आदेश जारी केला.




