Jaykumar Gore : मी आधुनिक अभिमन्यू; मंत्री जयकुमार गोरे यांचा रामराजे निंबाळकरांना अप्रत्यक्ष टोला

सोलापूर : आमदार, मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात आले तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे. सर्व चक्रव्यूह तोडणार आणि छाताडावर उभा राहणार असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. या विधानाद्वारे अप्रत्यक्षरित्या रामराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला असल्याची चर्चा रंगली आहे.सांगोला तालुक्यात मंत्री गोरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
मी आमदार होऊ नये म्हणून प्रचंड प्रयत्न केले. 20 वर्षापासून प्रयत्न करत आहेत. मंत्री होऊ नये म्हणून… पण झालो. मी मंत्री झाल्यानंतर त्यांना अशी कळ उठली, आता सर्व गोष्टी करून बघितल्या पण जयकुमार गोरे कधी थांबला नाही. कधी थांबणार नाही. कारण माझ्यासोबत सामान्य माणसाचे आशीर्वाद आहेत. जर खरंच मर्द असाल तर मैदानात येऊन बघा. माझा पराभव करू शकले नाही. पक्षातली आणि पक्षाबाहेरची त्यांनी सर्व ताकद लावली. तरी हा आधुनिक अभिमन्यू आहे. देवेंद्र फडणवीसांचा पठ्ठ्या आहे. सर्व चक्रव्युव्ह तोडणार आणि छाताडावर उभा राहणार, असे जयकुमार गोरे म्हणाले.
एकमेकांना जेलमध्ये टाकण्याची स्पर्धा
आमच्या इथे एकमेकांना जेलमध्ये घालायची स्पर्धा लागली आहे. राजकारण हा सूड बुद्धीचा खेळ झाला आहे. एकमेकांवर सूड उगवण्याची पद्धत सुरू झाली आहे. पण सांगोल्याला अपवाद आहे. या तालुक्याला विचार आहे. राजकारण कुठपर्यंत करायचे असते, हेही इथल्या लोकांना माहिती आहे.आदरणीय गणपतराव देशमुख असतील किंवा शहाजी पाटील असतील इतर नेतेमंडळींनी या तालुक्याला आदर्श घालून दिला. निवडणुकीच्या निकालानंतर एकमेकांची गळाभेट घेणारे उमेदवार हे सांगोल्यातच असू शकतात, असे गोरे म्हणाले.





