Jayant Narlikar : जयंत नारळीकरांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार केंद्र सरकारकडून राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा केली आहे. पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर आधारित, देशातील हे सर्वोच्च विज्ञान पुरस्कार देण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या पुरस्कारांमध्ये प्रख्यात दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ नारळीकर यांनी प्रसिद्ध महाविस्फोट सिद्धांताला आव्हान दिले होते.
डॉ. नारळीकर हे केवळ खगोलशास्त्रज्ञच नव्हते तर विज्ञान लेखकही होते. त्यांनी नाशिक येथे झालेल्या 94 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते. आपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखले जात. त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा आणि विज्ञानलिषयक लेखन लोकप्रिय ठरल्या आहेत. या पुरस्कारांच्या यादीत विज्ञान रत्नसह आठ विज्ञानश्री, चौदा विज्ञान युवा आणि एका विज्ञान संघ पुरस्काराचा समावेश आहे.
विज्ञान रत्न पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आयुष्यभरातील अतुलनीय कामगिरी आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी दिला जातो. याशिवाय, विज्ञानश्री पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो.विज्ञान युवा पुरस्कार 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या, परंतु याच क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना प्रदान केला जातो. तर विज्ञान संघ पुरस्कार, तीन किंवा त्याहून अधिक शास्त्रज्ञ, संशोधक किंवा नवोन्मेषकांच्या संघाच्या एकत्रित कामगिरीचा सन्मान करण्यासाठी दिला जातो.




