नवी दिल्ली – राष्ट्रीय लोक दल (रालोद) या पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी इंडिया आघाडीला रामराम केला आहे. चौधरी यांनी आपण आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. तसेच त्यांच्या पक्षाने एनडीएत (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला असतानाच उत्तर प्रदेशात काँग्रेससह इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. रालोद एनडीएत सहभागी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होत्या. दरम्यान, जयंत चौधरी यांनी आज (१२ फेब्रुवारी) पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी एनडीएत सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. जयंत चौधरी म्हणाले, आमचे आमदार आणि नेत्यांमधील नाराजीच्या बातम्या केवळ वृत्तवाहिन्यांवर पाहायला मिळत आहेत. मला वाटत नाही की कुठल्याही वृत्तवाहिनीने आमच्या नेत्यांशी बातचीत केली असेल. आम्ही सर्वांशी बोलूनच हा निर्णय घेतला आहे. आम्हाला खूप कमी कालावधीत हा निर्णय घ्यावा लागला आहे. फार वेळ घेण्यासारखी परिस्थिती आमच्यासमोर नव्हती. आम्ही आमच्या लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्याच्या विचारात आहोत. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतले पक्ष सातत्याने दावा करत होते की, जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोक दल हा पक्ष त्यांच्या आघाडीचाच एक भाग आहे. जयंत चौधरी इंडिया आघाडी सोडून कुठेही जाणार नाहीत. आम्ही सर्व पक्ष मिळून आगामी लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार आहोत, परंतु, आघाडीतल्या नेत्यांचे सर्व दावे आता खोटे ठरले आहेत.