जयललितांच्या निवासस्थानाचा वाद मिटला; घराचा ताबा मिळाला जे. दीपा यांना

चेन्नई – तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या चेन्नाई येथील निवासस्थानाची वाद आता मिटला आहे. या घराचा ताबा त्यांच्या भाची जे. दीपा यांना देण्यात आला आहे.
पोयस गार्डन या प्रतिष्ठित भागात हे प्रशस्त निवासस्थान असून त्याच्या किल्ल्या चेन्नाईचे कलेक्टर जे विजया रानी यांनी जे दीपा यांना जयललिता यांच्या निवासस्थानीच सुपूर्त केल्या. या मालमत्तेच्या त्या अधिकृत वारस असल्याचा निकाल म्रदास हायकोर्टाने दिला होता. अद्रमुक सरकारने हे निवासस्थान ताब्यात घेऊन तेथे जयललितांचे स्मारक बनवण्याचा घाट घातला होता. त्याला जे दीपा यांनी कोर्टात आव्हान दिले होते.
आज या घराचा ताबा मिळाल्यानंतर दीपा यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, हा विजय वाटतो तितका सोपा नव्हता. अभूतपूर्व संघर्षातून आपण हा विजय मिळवला असून त्यामुळे आपल्याला जे समाधान मिळाले ते शब्दात वर्णन करता येत नाही.
आपल्या कुटुंबीयांसह दीपा यांनी आज या घराचा ताबा घेताना तेथील जयललितांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. याच घरात आपण जयललितांबरोबर अनेक दिवस राहिलो आहोत. त्यामुळे या घराशी आपले जवळकीचे नाते आहे. हे घर संपादित करण्यासाठी तत्कालिन अद्रमुक सरकारने जी रक्कम कोर्टात जमा केली होती ती रक्कम आता सरकारला व्याजासह अदा करावी, असा आदेशही कोर्टाने दिला आहे.



